

डहाणूच्या वाढवण बंदराजवळील नवीन हरित विमानतळ प्रकल्पसाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी ग्रँट थॉर्नटन - निप्पॉन कोई इंडिया या समभागी सल्लागार संस्थेला कंत्राट देण्यात आले असून कामासाठी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडकडून (एमएडीसी) सोमवारी करण्यात आली आहे. या कामासाठी 30 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
वाढवण बंदराच्या उभारणीसाठी हालचाली सुरू असताना या बंदराला जोडणारे रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग यासाठी समांतर प्रक्रिया सुरू आहे. त्यातच बंदरातून होणारी विविध मालवाहतूक लक्षात घेता वाढवण विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. या विमानतळाच्या उभारणीच्या दृष्टिकोनातून पूर्व व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.
पहिल्या टप्प्यात विमानतळ विकास कंपनीकडून फेब्रुवारी 2025 मध्ये 100 दिवसांच्या अंतिम मुदतीसह पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मे महिन्यात तांत्रिक बोली उघडण्यात आल्या. तेव्हा सात निविदा सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन निविदाधारक आर्थिक बोली उघडण्याच्या टप्प्यात पात्र ठरले. यामध्ये सर्वात कमी बोली लावणार्या ग्रँट थॉर्नटन - निप्पॉन कोई इंडिया या कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याचे पत्र विमानतळ विकास कंपनीमार्फत सात जुलै रोजी देण्यात आले आहे.
विमानतळ पूर्वभ्यासासाठी मागवलेल्या निविदेमध्ये ग्रँट थॉर्नटन - निप्पॉन कोई इंडिया यासह रामबोल इंडिया, सीपीजी कन्सल्टंट इंडिया, क्रिएटिव्ह ग्रुप, पिनी ग्रुप, राइट्स, एसए इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टंटस अशा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी पहिल्या तीन कंपन्या पात्र ठरल्या. निकोन कोई इंडिया सहभागी कंपनीने 30 लाख रुपयांची बोली लावली. तर रामबोल इंडिया या कंपनीने दोन कोटी 28 लाख आणि सीपीजी कन्सल्टंट इंडिया या कंपनीने 12 कोटी 73 लाखाची बोली लावली होती.
त्यामुळे सर्वात कमी बोली लावलेल्या कोई इंडिया कंपनीला विमानतळच्या कामाचे हे कंत्राट जाहीर करण्यात आले. तर पुढील तीन कंपन्या या निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरल्या. हाँगकोंग, कांसाई, दालियन बे, अबुधाबी अशा कृत्रिम बेटांवर उभ्या असलेल्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे विमानतळ तयार होऊ शकते का? याचा अभ्यास वाढवण येथील भौगोलिक,पायाभूत माहितीच्या आधारे केला जाणार आहे.
ऑफशोर एअरपोर्ट अर्थात किनारी विमानतळ असे वाढवण विमानतळाचे प्रारूप असण्याची शक्यता आहे. विमानतळ उभारण्यासाठी खाजगी किंवा शेत जमीन संपादन करण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणून कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारणीचा प्रस्ताव पुढे आला आहे व त्यावर विचार केला जात आहे. प्रस्तावित किनारी विमानतळाच्याजवळ असलेल्या क्षेत्रातील प्रवाह क्षेत्राचा अभ्यास, बंदर प्रकल्पाचा उपलब्ध अभ्यास व पर्यावरण तसेच सागरी नियम यांचा पुरेपूर विचार करून हा पूर्व व्यवहार्य अभ्यास केला जाणार आहे. किनार्यावर उभारण्यात येणार्या या विमानतळामुळे निर्माण होणार्या हायड्रोडायनामिक्सचा काय परिणाम होईल याचाही अभ्यास नेमण्यात येणार्या संस्थेला करावा लागणार आहे.
प्रस्तावित किंवा संकल्पित वाढवण विमानतळासाठी केला जाणार्या पूर्व अभ्यास अहवालामध्ये प्रकल्पाचे बांधकाम व ऑपरेशन याचा सागरी व किनारपट्टीवर होणारा परिणाम याचे मूल्यमापन करणे. विमानतळासाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्राचे जलविज्ञान, भूगर्भशास्त्र संबंधातील अभ्यास, उपयोगिता, जागेची निवड किंवा पर्यायी जागा अशा संदर्भातली शिफारशींचा अभ्यास याचा समावेश राहणार आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, महाराष्ट्र सागरी मंडळ व तत्सम यंत्रणांच्या अधिकार्यांसोबत प्रस्तावित विमानतळाच्या हद्दीसाठी मर्यादा निश्चित करण्याचे धोरण या अंतर्गत आहे. दुय्यम स्त्रोतांकडून नो फ्लाईंग झोन, नो ऍक्टिव्हिटी झोन, नो फिशिंग झोन यासंदर्भांचा माहितीचे संकलन या विमानतळाच्या माहितीसाठी महत्त्वपूर्ण असणार असून त्याचा सविस्तर अभ्यास व त्याआधारे माहिती संकलित करणे या कामाअंतर्गत नियुक्त केलेल्या संस्थेला करावी लागणार आहे.
दुय्यम माहितीचे संकलन
साइट विश्लेषण आणि शिफारस (टोपोग्राफी/ जिओटेक्निकल/सागरी/हायड्रोलॉजिकल)
वाहतुकीचा प्राथमिक अंदाज, नियोजनाचा विचार, प्रकल्प सुविधा आवश्यकता आणि ब्रॉड मास्टर प्लॅन
व्यवहार्यता अहवालाचा मसुदा
अंतरिम अहवाल
जमिनीची गरज (किनार्यावर/अपतटीय/ पुनर्वसन)
ब्लॉक खर्चाचा अंदाज, विकासाला गती
प्रस्तावित विकासासाठी विविध नियमांची ओळख, प्रकल्प मंजुरी आवश्यक आहे
आवश्यक असलेल्या विविध संसाधनांची ओळख
अडथळा मर्यादा सर्वेक्षण (ओएलएस) आणि चार्ट आणि इतर वैमानिक सर्वेक्षण असल्यास
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवन बंदर क्षेत्रातील ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासासाठी पूर्वव्यवहार्यता अभ्यास वाढवन बंदर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेशी लिंक एक्सप्रेसवे (खाली काळ्या रंगात दाखवलेला) द्वारे जोडला जाईल आणि प्रस्तावित भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा हा एक प्रमुख भाग असेल.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणमार्फत मुंबईपासून सुमारे 140 किमी उत्तरेस पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराचा खोल गाभा असलेले बंदर म्हणून विकास करत आहे. बंदरात 9 कंटेनर टर्मिनल असतील, प्रत्येकी 1000 मीटर लांबीचे, 4 बहुउद्देशीय बर्थ असतील, ज्यामध्ये कोस्टल बर्थ, 4 लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ आणि एक कोस्ट गार्ड बर्थ यांचा समावेश असेल. तर रेल्वे मार्ग थेट बंदराला जोडला जाणार आहे.
विमानतळामध्ये स्थलाकृती किंवा भू-तांत्रिक मूल्यांकन अर्थात हवामान मूल्यमापन, समुद्रविज्ञान आणि बाथिमेट्री तपासणी अशा धोक्यांचा अभ्यास करणे, पुनर्वसन,माती प्रक्रिया / सुधारणा, हायड्रोलॉजिकल मूल्यांकन, पर्यावरणीय मूल्यांकन, सीआरझेड तरतुदीनुसार आवश्यक मंजुरी, ऑपरेशनल,धावपट्टीच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करण्याची जबाबदारी आहे.