

मच्छिंद्र आगिवले
वाडा: निसर्गसंपन्न व नयनरम्य अशी ओळख असणाऱ्या वाडा तालुक्याची मागील दहा वर्षात बेसुमार प्रदूषणाने वाताहत झाली असून सध्या या तालुक्यात श्वास घेणे अवघड बनले आहे. एकीकडे प्रदूषणकारी कारखाने जगणे मुश्कील करीत असून दुसरीकडे दगड खदानी व क्रशर मशीन डोंगर पोखरत आहेत. खाजगी जागा असल्या तरी पर्यावरणाची बेसुमार हानी होत असून बेलगाम गौणखनिज वाहतुकीमुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे.
पालघर जिल्ह्यात अनेक मोठमोठे प्रकल्प सध्या उभारले जात असून काँक्रीटचे जंगल शहरात उभे राहत आहे. विकासकामांच्या या बकासुराला लागणारे बहुतांश गौणखनिज वाडा तालुक्यात जात असून मोठमोठे डोंगर यासाठी भुईसपाट होऊ लागले आहेत. तालुक्यातील डोंगस्ते, मुसारने, बुधावली, गुंज, डाकीवली, पालसई, खरिवली, मांडा - भोपिवली, वाडा, देसई, खैरे,आंबिवली, कंचाड अशा अनेक गावांत दगड खदानी व क्रशर मशीन यंत्रांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.
दगड खदानी व क्रशर मशीन मधील धुळीच्या कणांमुळे एकीकडे प्रदूषण वाढत असून दुसरीकडे डोंगर व निसर्गसंपदेची राखरांगोळी होत आहे. पाण्याचे स्रोत संकटात सापडले असून सुरुंग स्फोटांनी घरांचे नुकसान व नागरिकांची झोप उडाली आहे.
मूठभर माणसे अमाप पैसा कमवून गलेलठ्ठ होत आहेत तर सामान्य जनता समस्यांचे चटके सहन करीत आहे. सरकार दरबारी सर्व व्यवसाय अधिकृत पद्धतीने सुरू असले तरी यामुळे पर्यावरणाची कधीही न भरून येणारी हानी सुरू आहे हे दुर्दैवी आहे.
तालुक्यातून शेकडो हायवा ट्रक रस्त्यावरून दररोज धावत असून वाहनांच्या क्षमतेहून कित्येक पट जास्त भार घेऊन गाड्या राजरोस फिरत असल्याने रस्त्यांची हानी होत आहे. अति अवजड वाहनांमुळे तालुक्यातील सर्व रस्ते मरणपंथाला गेले असून दगड खदानी व क्रशर मशीन व्यवसायाचा फायदा कमी मात्र नुकसान बेसुमार सुरू आहे. जिल्हा प्रशासन व महसूल विभागाच्या डोळेझाक भूमिकेमुळे प्रदूषणकारी व पर्यावरण विरोधी व्यवसायांना बळ मिळत असून काही वर्षात समृद्ध असणारा हा तालुका भकास झालेला असेल यात शंका नाही.