

पालघर : पालघर जिल्ह्यात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. एका घटनेत पालघर तालुक्यातील सूर्या मासवण नदीत एकाचा तर कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. या दोन्हीही घटना रविवारी घडल्या आहेत.
सूर्या नदीमध्ये अभिषेक बिऱ्हाडे नामक तर कालव्यात लक्ष मर्दे यांचा मृत्यू झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने नदी, नाले, ओढे, खदानी, किनारे भागात गारवा मिळावा म्हणून पोहण्यासाठी येतात. यामध्ये तरुणांची संख्या मोठी असते. अशीच गर्दी रविवारी मासवण सूर्या नदीवर झाली होती. अभिषेक बिन्हाडे हा चोवीस वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत पोहायला आला होता.
पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज त्याला आला नाही. याचवेळी पोहताना तो पाण्यात गेला असता तेथे बुडाला. काही वेळ तो बाहेर न आल्याने त्याच्या मित्रानी स्थानिक व पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने शोध मोहीम राबवून अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला गेला. दुसन्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये पोहत असताना धाकटी डहाणू येथील दक्ष सागर मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक आणि पोलीस कालव्याच्या खालच्या भागात त्याचा शोध घेत असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला.