

वसई : नालासोपारा मधील बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी जीवन संपवल्या प्रकरणी दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. जीवन संपवण्यापूर्वी चौहान यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत श्याम शिंदे आणि राजेश महाजन पोलीस अधिकार्यांचा छळाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे लिहून ठेवले होते. या दोघांच्या अटकेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जयप्रकाश चौहान हे नालासोपारा मधील बांधकाम व्यावायिक होते. मंगळवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यामध्ये पोलिस कर्मचारी श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांना जबाबदार धरले आहे. या दोघांनी चौहान यांना 50 लाखांचे कर्ज दिले होते. त्या कर्जाच्या परतफेडीसाठी दोघे चौहान यांचा मानसिक छळ करत होते.
आचोळे पोलिसांनी शाम शिंदे, राजेश महाजन तसेच लाला लजपत या तिघांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या तिघांना बुधवारी दुपारी वसई सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी श्याम शिंदे याने 50 लाख रूपये दिले होते. एका वर्षात दुप्पट रक्कम मिळणार होती. जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता. मात्र इमारत बांधकामास एक वर्षाहून अधिक वेळ झाल्याने पोलिस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला होता.
जयप्रकाश यांनी 22 लाख ऑनलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख दिले होते. तरी ते तिघे उर्वरित रकमेसाठी त्रास देत होते. ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला.