

मोखाडा : पारंपरिक शेती सोबतच आता मोखाडा तालुक्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळत आहेत. कमी पाण्यावर येणारे आणि चांगले उत्पन्न देणारे पीक असल्याने, शेतकरी आता हळदीची लागवड करण्यास पसंती देत आहेत. खोडाळा गावातील प्रगतशील शेतकरी राह फाऊंडेशनच्या सहकार्याने आता पारंपरिक पिकांऐवजी हळदीसारख्या फायदेशीर पिकांकडे वळत आहेत.
निसर्गाचा वाढत चाललेला असमतोल आणि पारंपारिक शेतीमधील कमी होत असलेली उत्पादकता लक्षात घेऊन मोखाडा व खोडाळा भागातील शेतकर्यांनी आपल्या अर्धा एकर तर कुठे एक एकर जागेत हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी करायला घेतला आहे. काही भागातील शेतकर्यांनी हळदीची लागवड केली असून रोपे वाढलेली आहेत तर काही ठिकाणी अजुनही हळद लागवडीची कामे सुरू आहेत. यामुळे या भागातील शेतकरी वेगवेगळी पिके घेऊन त्यातून जास्तीचे उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
योग्य नियोजन केल्यास हळद शेतीही कशी फायद्याची ठरू शकते, याकडे त्यांचा कल आहे. हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत.
भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस मोखाडा तालुक्यातील वातावरण अनुकूल असल्यामुळे हळदीची लागवड होऊ शकते. उष्ण व दमट हवामानात हळद चांगली वाढते. यासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. चांगला निचरा होणारी, चिकणमाती किंवा वालुकामय माती हळदीसाठी योग्य आहे. मातीचा पीएच 6.5 ते 8.5 च्या दरम्यान असावा. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी खताचा योग्य वापर करणे गरजेचे असून शेणखत आणि युरिया यांचा वापर फायदेशीर ठरतो.
हळद हे देशातील एक प्रमुख नगदी मसाला पीक आहे. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. या गुणवैशिष्ट्यांमुळे हळदीला विशेष महत्त्व आहे. निसर्गाचा असमतोलपणा आणि खर्चिक होत चाललेली पारंपारिक पिकांना यंदा थांबवून राह फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाने पारंपरिक पिकांना पर्यायी शेती म्हणून हळद लागवड करायचा निर्णय घेतला असल्याचे शेतकर्यांनी बोलताना सांगितले आहे.