Cultural loss in agriculture : पारंपरिक रोवणी गीतांचा ओसरतोय सूर
बोईसर ः पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागात वर्षानुवर्षे चालत आलेल्या भात रोपणीशी संबंधित पारंपरिक गीतांची परंपरा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. जून-जुलै महिन्यात सुरू होणार्या रोवणीच्या हंगामात, पूर्वी महिलांच्या ओठांवर श्रमगीत असायची, शेतात‘आवा... आवा...’ अशा स्वरात नाद घुमायचा. मात्र आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे आणि सांस्कृतिक बदलामुळे ही परंपरा आता केवळ आठवणीत शिल्लक राहू पाहत आहे.
पालघर जिल्ह्यात विशेषतः जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, आणि डहाणू तालुक्यांत भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. याठिकाणी भाताची पेरणी आणि रोवणी करताना महिला पारंपरिक गाणी म्हणत, त्या गाण्यांमधूनच त्यांचे दुःख, आनंद, सासरची कुचंबणा, माहेरचे प्रेम, निसर्गाचे वर्णन असे अनेक भाव भावनांनी भरलेले शब्द व्यक्त होत.
ही गाणी केवळ मनोरंजनाचे साधन नसून एकप्रकारे श्रमसोपानाचे साधन देखील होती.शेतीसाठी मजूरही सहज मिळत नाहीत, तरुण पिढी शहराकडे वळली आहे, परिणामी एकेकाळी 15-20 जणांच्या झुंडीने होणारी रोपणी आता काही मोजक्या मजुरांच्या भरोशावर उरकली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, मशीनद्वारे रोपणी आणि तांत्रिक बदलांमुळे श्रम आणि त्यातला आनंद दोन्ही कमी झाले आहेत.
पूर्वी रोवणी पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी चिखल खेळत शेतकर्याच्या घराकडे मिरवणूक काढण्याची परंपरा होती. अंगाला चिखल लावून, ढोल-ताशांच्या निनादात मजूर शेतकर्याकडून ’भोजारा’ म्हणजे बक्षीस घेत. शेतमालकही त्या दिवशी विशेष जेवणाची मेजवानी ठेवून मजुरांचे स्वागत करायचा. मात्र आज या सार्या गोष्टी इतिहासजमा होत चालल्या आहेत.

