

खानिवडे : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदरच्या वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा अवजड टँकर कठडा तोडून खाडीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11 .30 च्या सुमारास घडली. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून विरारवरून ठाण्याच्या दिशेने जाणार्या मार्गावरून ऑइल वाहून नेणारा ऑइल भरलेला टँकर जुन्या पुलावरून जात असताना त्याच रस्त्यावरून विरारकडे नेणार्या दुसर्या वाहनाला जोरदार धडकला . यामुळे टँकर अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून पुलावरून थेट खाडीत कोसळला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती काशिगाव पोलीस व वाहतूक विभाग यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाला ही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शोधकार्य सुरू केले होते.
दरम्यान या अपघातानंतर एक माणूस खाडीत पुलाच्या पिलर जवळ तरंगत होता . त्याला बाहेर काढण्यासाठी इतर वाहन चालकांनी गाडीत असलेली जाड दोरी सोडली होती. मात्र तो कुठलीही हालचाल करत नव्हता. त्याचा जागीच बुडून मृत्यू झाला होता . तो चालक होता की आणखी कोण हे कळू शकले नाही. मात्र आतापर्यंत त्या तरंगणार्या 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. अजून अन्य कोणी व्यक्ती खाडीत कोसळलेल्या टँकर मध्ये अडकला आहे का, याचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय हा कोसळलेला टँकर बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केले होते.