

तालुक्यात 7 मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शासकीय मालमत्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळांची प्रंचड वाताहात केलेली असून जवळपास 9 शाळा वरील पत्र्याची छप्पर वार्याच्या प्रचंड वेगाने विट बांधकाम तोडून पत्रे उडवून दिले होते.या घटनेला एक महिना पुर्ण झालेला असून सोमवार पासून शाळांची घंटा वाजणार आहे.तरी देखील त्या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुहूर्त मिळाला नसून विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत बसून धडे गिरवण्याची वेळ आलेली आहे.
मागील मे महिन्यात तालुकाभरात झालेल्या जोरदार वादळीवार्यासह अवकाळी पावसाने ठाकुरवाडी, धामणशेत, कुर्लोद,घोसाळी,करोळ,पाचघर येथील जिल्हा परिषद शाळांची वाताहात झालेली असून वार्याच्या वेगाने विट बांधकाम तुटून पत्रे उडून गेलेले आहेत.सुदैवाने अवकाळी पाऊस येण्याची वेळ ही शाळांना उन्हाळ्यातील सुट्टी लागण्याची असल्याने जिवितहानी टळली होती.परंतू सोमवार पासून शाळांची पुन्हा घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांची वर्गात बसायची अडचण होणार आहे.जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या छताची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत वर सोपवली असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे घोसाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही नगरपंचायत हद्दीत येत असल्याने या शाळेच्या दुरुस्तीकरीता नगरपंचायत प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या वर्ग खोलीत बसून धडे गिरवावे लागणार आहेत.
यामुळे अनावश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधकाम,गटारी बांधकाम अशी एकना अनेक कामे तात्काळ मंजूर करुन लाखो रुपये खर्च केले जातात तीथे देशाची भावी पिढी घडविण्याचे काम ज्या ज्ञान मंदिरामधुन केले जाते अशा शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पैसे नाहीत हे मात्र अनाकलनीय आहे.
आजमितीला तालुक्यातील 60 जिल्हा परिषद शाळांमधील 99 वर्गखोल्या दुरुस्ती साठी आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.यात वर्गखोल्या, स्वयंपाक गृह, स्वच्छता गृहाचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्यात दरवर्षी प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची मोठी परवड असते.अद्ययावत पायाभूत शिक्षण मिळविण्याचा मुलभूत हक्क असतांनाही जिथे शाळेत बसण्याची व्यवस्थाच सुस्थितीत नाही तीथे शिक्षण विभागाने मारलेल्या अद्ययावत शिक्षणाच्या गमजा अक्षरशः दिशाभूल करणार्या आहेत.त्यामूळे आधी सर्व सुविधायुक्त प्राथमिक शिक्षण पुरविण्याची मागणी पालकवर्ग करत आहेत.
मागील महिन्यात अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या जिल्हा परिषद शाळांची तात्पुरती दुरुस्ती करण्याची सूचना ग्रामपंचायतींना केलेली आहे.तर दोन वर्ग खोल्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसर्या वर्ग खोलीत बसविण्याच्या सुचना शिक्षकांना केल्या आहेत.
वसंत महाले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मोखाडा.