

पालघर : खरीप हंगामात शेतीची कामे सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांचा निसर्गाशी थेट संपर्क वाढल्याने सर्पदंश आणि विंचू चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक घटना समोर आल्या आहेत. पालघर पूर्वे कडील मनोर ग्रामीण रुग्णालयात मागील तीन महिन्यांत सर्पदंशाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात एकूण १०२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील १७रुग्णांना गंभीर स्थितीत पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात दररोज सरासरी एक सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. सर्प दंश झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन रक्ताची चाचणी करून विषारी आणि बिन विषारी दंश अशी वर्गवारी करून रुग्णांवर तातडीने औषधोपचार केले जात आहेत.
गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवले जाते. पालघर पूर्वेच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली तरी, सर्पदंशाच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात अँटी-स्नेक व्हेनम लसींचा साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे सर्प दंश झालेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सर्पदंश किंवा विंचूदंश झाल्यास रुग्णाला त्वरित नजिकच्या प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे आवाहन मनोर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राजगुरू यांनी केले आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालयातील सर्प दंश रुग्णांची माहिती
मे महिन्यात २८ तर जून मध्ये ३३ आणि जुलै महिन्यात ४१ रुग्णांची नोंद मनोर ग्रामीण रुग्णालयात झाली होती. सर्प दंशाच्या एकूण १०२ रुग्णांपैकी १७ रुग्णांना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले.