

मनोर - वाडा - भिवंडी या महामार्गाची दुर्दशा झाली असून मागील 15 वर्षात या महामार्गावर वाहनचालकांना जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुर्दैव याच गोष्टीचे आहे की रस्ता दुरुस्तीसाठी आतापर्यंत अनेक कंत्राटदारांनी आपले उखळ पांढरे केले असून रस्त्यांच्या अवस्थेत मात्र टीचभर फरक पडलेला नाही.
महामार्गावर दुरुस्तीच्या नावे आजपर्यंत ज्या कंत्राटदारांनी निधी हडप केला याचा हिशोब घेण्यासाठी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून वाडा व भिवंडी या तालुक्यातील तब्बल 11 ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत हे आंदोलन सुरूच असल्याने सामान्य जनतेचे मात्र अतोनात हाल झाले.
वाडा ते भिवंडी या 42 किमी मार्गाची प्रामुख्याने प्रचंड वाताहत झाली असून गुडघ्या इतक्या खड्ड्यातून वाहने हाकताना वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एका खासगी कंत्राटदाराला 801 कोटी रुपयांचा निधी खर्च करून काँक्रीटीकरणाचे काम देण्यात आले असून काही भागात काँक्रीटीकरणेचे एकेरी काम पूर्ण झाले आहे. एका बाजूला मात्र रस्त्याची अवस्था भीषण असून यातून गाड्या चालणार कशा असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
कंत्राटदार कंपनीचे काम देखील अतिशय संथ सुरू असून पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीकडे त्यांचा कानाडोळा असल्याने जनता बेजार झाली आहे. मनोर - वाडा - भिवंडी महामार्गासह चिंचोटी - कामण - अंजूरफाटा या मार्गाची देखील चाळण झाली असून दोन्ही मार्ग लोकांच्या दळणवळणाचे प्रमुख स्रोत आहेत.
संतापजनक बाब म्हणजे मनोर - वाडा - भिवंडी महामार्गावर गवत काढून झाडांना रंगरंगोटी करणे, खड्डे भरून बाजूपट्ट्यांची दुरुस्ती करणे अशा विविध किरकोळ कामांसाठी तब्बल 72 कोटींहून अधिक निधी खर्च केल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणजे आहे. तालुक्यातील काही नामांकित कंत्राटदार या कामात सहभागी असून प्रत्यक्षात यातील कामे न करताच निधीची लयलूट केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
सकाळी 11 वाजेपासून वाडा तालुक्यातील खंडेश्वरीनाका, शिरीषपाडा, कुडूस व डाकिवलीफाटा तर भिवंडीअंबाडीसह जवळपास 11 ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन बेमुदत असल्याने जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा आंदोलकांचा असून मुसळधार पावसातही उत्साह मात्र कायम होता. दुपारी तर आंदोलकांनी जेवणासाठी चुली देखील थाटण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर रास्तारोको असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. आंदोलनाची आगाऊ कल्पना असल्याने पोलिसांनी नियोजन केले होते, मात्र तरीही शाळकरी विद्यार्थी व नोकरदार वर्गाचे अतोनात हाल झाले. एसटीच्या अनेक बसगाड्या स्थानक व आगार अडकून पडल्या असून सर्व वाहतूक जागच्याजागी ठप्प झाली होती.
2023 ते 25 या वर्षात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जो खर्च काही कंत्राटदारांनी गिळंकृत केला आहे तो तत्काळ वसूल करून घ्यावा, पालघर व ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकार्यांनी कंत्राटदारांना न केलेल्या कामाची खोटी बिले काढून देत जनतेची व सरकारची फसवणूक करून शासनाच्या निधीची लयलूट केली त्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, अंबाडी ते वाडा हा मार्ग तात्काळ खड्डेमुक्त व वाहतुकीसाठी सुकर करून द्यावा.