

पालघर: चौथ्या मुंबईतील सर्व रस्ते हे गतिमान केले जातील.आणि त्यांची क्षमताही वाढवली जाईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे राजे भोसेले यांनी पालघर दौर्या दरम्यान केली.
वाढवण ते समृद्धी महामार्गा तसेच वाढवण ते जेनपीए आणि वाढवण ते वाडा- मोखाडा-भिवंडी पर्यंतचा परिसर हा गतिमान रस्त्यांनी जोडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच पालरच्या पुरस्थितीचा आढावा घेत सर्व नुकसानग्रस्त भागांमधील सोयीसुविधांबाबत सुचना संबधित विभागांना यावेळी देण्यात आल्या.
पुरामुळे नुकसान झालेल्या पालघर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पालघर जिल्हा दौऱ्यावर आले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून घेतली.
पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत अभियंत्यांना निर्देश दिले.
सायंकाळी डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.