

Seed prices increased by 10 percent this year
विक्रमगड : पुढारी वृत्तसेवा
पाऊस एक महिना आधीच चालू झाल्याने विक्रमगड वाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली असून, भात पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी बियाण्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी खरीप पिकांचे नियोजन बिघडत असून, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच उत्पादनासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च वाढला असतानाच बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती नकोशी होत आहे.
मागील वर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर मिळाला होता. त्यात अधिकचा मिळणारा बोनस मिळालेला नाही. भाताला मिळणाऱ्या तुटपुंज्या भावात शेतीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे भाताचा भाव ४००० पर्यंत तरी हवा अशी मागणी शेतकरी करत होते.
दुसरीकडे शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर वियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसाचा ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या चितेमध्ये अधिकच भर पडली असून पेरणीचे नियोजन पार कोलमडले आहे.
शेतकरी महागड्या आणि नामांकित कंपन्यांचे भात बियाणे अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करतात. तरीही अनेक वेळा उत्पादन निघाल्यावर बाजार व्यवस्थेकडून दर पाडले जातात. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते. अशा अनुभवामुळे शेतकरी मानसिक तणावात जातात आणि पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकतात.
शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून, दर दिवसागणिक मजुरीचे दर वाढत आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांना वेळेवर बँकेकडून पीककर्जही मिळत नसल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.