

पालघर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आहे. मनोरजवळील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे. या वृत्तामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उत्साहाचे वातावरण असून, कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या या प्रवेशोत्सवाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अधिक सक्रिय झाला आहे. अधिकाधिक पटसंख्या आणि सुसज्ज इमारत असलेल्या शाळांचा शोध शुक्रवारी दिवसभर बांधकाम विभागाकडून घेण्यात आला. सुरुवातीला पालघर शहरातील काही जिल्हा परिषद शाळांची पाहणी अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी केली. त्यानंतर, महामार्गावरील दुर्वेस जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमासाठी याच शाळेची निवड निश्चित मानली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य पालघर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. नांदगाव येथील हेलिपॅडच्या सद्यस्थितीबाबत मनोर पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला आहे, जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची आणि पुढील कार्यक्रमांची योग्य व्यवस्था करता येईल.
शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मनोर येथे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या एका सभेला संबोधित करणार असल्याचेही समजते. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.