

पालघर : पालघरमधील एका नामांकित मिठाई दुकानदाराने शेकडो ग्राहकांना विक्री केलेल्या मिठाईमध्ये बुरशी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल ५०० पेक्षा जास्त मिठाईंच्या पाकिटांमध्ये बुरशी लागल्याचे समोर आले. याबाबत नागरिकांनी आणि कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आसता, मनसे आक्रमक झाली.
त्यांनी या मिठाई दुकानाच्या मालकाला चांगलेच धारेवर धरले. मनसेने केलेल्या आंदोलनाची चित्रफीत समाज माध्यमांवर तुफान वायरल होत असल्याने हे मिठाईचे दुकान चांगलेच चर्चेत आले आहे. निकृष्ट दर्जाच्या मिठाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालवल्याचा आरोप दुकानदारावर केला गेला आहे. पालघर शहरात हुतात्मा स्तंभ भागात नामांकित 'जनता स्वीट्स' नावाचे मिठाईचे दुकान आहे. या दुकानातून काटाळे ग्रामपंचायत, पालघरमधील टीएसए प्रोसेस इक्विपमेंट कंपनी तसेच सातपाटी ग्रामपंचायत आदींनी कामगारांना आणि सदस्यांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केली होती. मात्र या मिठाईचे वाटप केल्यानंतर बहुतांश मिठाईला दुसऱ्या दिवशीच बुरशी लागल्याचे समोर आले. एकापाठोपाठ सर्व ठिकाणाहून ही तक्रार येऊ लागली.
त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत नागरिकांचे हित म्हणून मिठाई दुकानाच्या मालकाला जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी मालकाने आपली चूक कबूल करून मिठाई बनवण्यासाठी आलेल्या दुधामध्ये काही समस्या निर्माण झाल्याने हा प्रकार झाला असावा असे मनसे शिष्टमंडळाला सांगितले. मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दुकानदाराला जाब विचारल्यानंतर ही आमची जबाबदारी असून खराब झालेली सर्व मिठाई बदलून देण्याची ग्वाही मालकाने दिली आहे.