

पालघर: "सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्ये आरपीआयची मोठी ताकद आहे. मात्र, तेथील पक्षांनी आम्हाला अपेक्षित जागा दिल्या नाहीत, तर आम्ही स्वबळावर लढू. भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांची काही टक्के मते आम्ही कमी करू शकतो, एवढी ताकद आमच्या पक्षाची आहे. भाजपची मते कमी होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; त्यासाठी त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात," असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालघर येथे केले.
आरपीआय (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय नेते दिवंगत सुरेश बारशिंग यांच्या निधनानंतर पालघरमध्ये पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याच्या सत्तेत अधिक वाटा मागणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आठवले म्हणाले की, "भाजप फक्त माझ्याकडे लक्ष देत आहे; मात्र माझ्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण त्यांच्यामुळेच मी मोठा आहे. त्यामुळे विधान परिषदेची जागा आणि विविध महामंडळांमध्ये माझ्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी तसा शब्दही मला दिला आहे." पूर्वी काँग्रेससोबत असताना आम्हाला अधिक जागा मिळत होत्या, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. केवळ भाजपच नव्हे, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील महामंडळे आणि लाभाची पदेही आम्हाला मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली.
पुढे बोलताना आठवले म्हणाले, "कोणत्याही पक्षाच्या वाढीसाठी तो सत्तेत असणे गरजेचे असते, याच मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो. आरपीआयने भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळेच या युतीला 'महायुती' हे नाव मिळाले. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी हे पक्ष आमच्यानंतर भाजपसोबत आले, पण त्याआधी आम्ही त्यांच्यासोबत होतो." महाराष्ट्रात आम्ही महायुती म्हणून भाजपसोबत असलो तरी देशपातळीवर आमची अशी युती नाही. त्यामुळे आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि स्थानिक पक्षांकडे आम्ही सन्मानपूर्वक जागांची मागणी करू; अन्यथा स्वबळावर लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, शोकसभेत बोलताना त्यांनी दिवंगत नेते सुरेश बारशिंग यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पालघर आणि बारशिंग यांचे असलेले घट्ट नाते अधोरेखित केले.
आगामी काळातील विधान परिषद आणि महामंडळ वाटपात भाजप व मित्रपक्ष आरपीआयला न्याय देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांना लाभाची पदे मिळाली नाहीत तरी आठवले महायुतीविरुद्ध मोठे बंड करतील अशी चिन्हे पत्रकार परिषदेतून दिसून आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या या मागणीचा महायुतीवर नेमका किती परिणाम होतो, हा उत्सुकतेचा विषय आहे.
अजितदादा प्रकरणात 'एफआयआर' दाखल करावा
पालघर येथील पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, रामदास आठवले यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. "अजितदादा प्रकरणात जो तपास व्हायचा तो होईल; मात्र रोहित पवार यांनी एफआयआर (FIR) दाखल करण्याची जी मागणी केली आहे, तिला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल व्हायलाच हवा," अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.