Prakash Nikam joins BJP : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निकम भाजपात जाणार

जिल्हा परिषदेची समीकरणे जुळवण्याचे भाजपाकडून प्रयत्न
Prakash Nikam joins BJP
प्रकाश निकमpudhari photo
Published on
Updated on

पालघर : हनिफ शेख

शिदे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांचा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असून यासाठी पालघर जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी सुद्धा तयारीला लागले आहेत. तर शिवसेनेला (शिंदे गट) हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश निकम हे शिवसेनेचे जुने पदाधिकारी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जात होते यामुळेच त्यांना शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सुद्धा बहाल करण्यात आले होते. यानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप कडून प्रकाश निकम यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा होती त्यानंतर पुन्हा विक्रमगड विधानसभेची उमेदवारी निकम यांना मिळू शकेल अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र दोन्ही वेळा त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या सगळ्यांमध्ये आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांची सलगी वाढल्याने ते कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मध्यंतरी तर त्यांच्या प्रवेशाच्या तारखा सुद्धा जाहीर झालेले होत्या मात्र अशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशाला थांबविल्याची चर्चा सुद्धा राजकीय गोटातून केली जात होती मात्र आता त्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा संपली असून आज सायंकाळी पाच वाजता मुंबई प्रदेश कार्यालय येथे त्यांचा शेकडो समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे यासाठीची जोरदार तयारी जव्हार मोखाडा भागात रात्रीतून दिसून आली प्रकाश निकम हे कोणत्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत प्रवेश करतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी हा प्रवेश भरगच्च दिसावा यासाठी पालघर भाजपकडून सुद्धा आपल्या समर्थकांना मुंबईला बोलावणे आल्याचे सांगितले जात आहे.

मुळात प्रकाश निकम हे शिवसेनेचे अतिशय जुने आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात सुद्धा शिवसेनेतूनच झाली होती. 2000 साली ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर निकम स्वतः दोनदा सभापती त्यांच्या पत्नी तीनदा सभापती निकम दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य पत्नी एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य याशिवाय प्रकाश निकम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी शिवसेनेतून भूषवली आहेत.

शिवसेनेचा आदिवासी चेहरा अशीही त्यांची ओळख होती मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर निकम हे झेडपी अध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्यामध्ये सलगी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे त्यातूनच हा प्रवेश होत असला तरी प्रकाश निकम यांनी मात्र प्रवेशाचे कारण वेगळे सांगितले आहे.

या प्रवेशावेळी त्यांना मानणारे अनेक सरपंच, नगरपंचायतीचे नगरसेवक,काही माजी पंचायत समितीचे सदस्य सुद्धा त्यांच्या सोबतीने भाजपमध्ये जाणार असल्याने पर्यायाने शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद कमी होणार असल्याचे दिसून येते. याशिवाय पहिल्यांदाच शिवसेनेचा मोठा नेता भाजपने पळवल्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये धुसफुशीचा हा दुसरा अंक म्हणावा लागेल यामुळे पालघर वर प्रेम असणारे एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मला शिवसेनेने आणि एकनाथ शिंदे यांनी भरपूर दिले माझी त्यांच्याबद्दल कसलीही तक्रार नाही मी शिवसेनेवर टीकाही करणार नाही. मात्र मी बंडखोरी करून लढल्यानंतर मला धोका देणार्‍याला शिवसेनेने पक्षात घेतले त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करू शकत नाही यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे.

प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news