

डहाणू : डहाणू तालुक्यातील कैनाड परिसरात प्लॉट वाटपाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. जयवंतराव नलावडे या नावाने वावरणारा या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार गेल्या काही महिन्यांपासून फरार असून पोलिसांनी याप्रकरणी कंपनीच्या काही स्थानिक संचालकांना अटक केली आहे. मात्र, मूळ आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
तुळजाभवानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2022 साली डहाणूतील कैनाड परिसरात एक प्लॉटिंग प्रकल्प पूर्ण केल्यानंतर दुसर्या टप्प्यात कैनाड मेरीपाडा येथे 10 ते 12 गुंठ्यांचे 62 प्लॉट्स विकसित करण्याची योजना आणली होती. या योजनेसाठी प्रत्येक गुंतवणूकदाराकडून सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम घेण्यात आली होती.
योजनेनुसार प्लॉट मिळण्याबरोबरच काही रक्कम परत मिळणार होती आणि एक आलिशान चारचाकी वाहन किंवा 25 लाखांचा बोनस देखील देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आकर्षक आश्वासनांमुळे अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. सहा महिन्यांत प्लॉटचे हस्तांतरण आणि रकमेचा परतावा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वेळेनुसार काहीच न घडल्याने गुंतवणूकदारांनी थेट कार्यालयात धाव घेतली. त्यावेळीही त्यांना केवळ आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पालघरमधील कंपनीचे कार्यालय बंद झाले आणि काही महिन्यांनी डहाणूतील कार्यालयही अचानक बंद करण्यात आले.
मुख्य सूत्रधार जयवंतराव नलावडे याच्याशी संपर्क होणे बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच कंपनीशी संबंधित काही स्थानिक संचालक, ज्यांच्यामार्फत नोटरीकडे करारनामे नोंदणीकृत करण्यात आले होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा प्रमुख सूत्रधार खोट्या नावाने वावरत होता, असे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत 10 ते 12 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फसवणुकीसाठी वापरलेली तुळजाभवानी प्रॉपर्टीज कंपनीची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रद्द प्रक्रिया करताना कोणतीही अधिकृत जाहीरात देण्यात आलेली नाही आणि गुंतवणूकदारांची ना-हरकत प्रमाणपत्र घेतले गेलेले नाही. योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी सुमारे दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक देशमुख यांनी इतर फसवणूक झालेल्या नागरिकांनीही पुढे येऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे. लवकरच मुख्य आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.