

चेतन इंगळे -विरार
मुंबईच्या उपनगरी प्रवासाला नवे पर्व देणारा पनवेल-बोरीवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिल्यामुळे लाखो प्रवाशांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. या मार्गामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांना कुरला वा वडाळा येथे गाडी बदलण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
या मार्गाची एकूण लांबी तब्बल 69.23 किलोमीटर असून उभारणीसाठी 12 हजार 710 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पनवेलहून थेट बोरीवली व वसईपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत या दोन टोकांदरम्यान प्रवाशांना केवळ बदल्या करून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या सर्वांचा अपव्यय होत होता. हा नवा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासातील सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि दररोज लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
मुंबई महानगर प्रदेशात सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारा प्रवासी ताण लक्षात घेता हा नवा कॉरिडॉर अत्यावश्यक ठरत आहे. यामुळे विद्यमान मार्गावरील ताण कमी होईल आणि रेल्वेसेवा अधिक सुरळीत व नियोजनबद्ध करता येईल. हा मार्ग पनवेल-करजत प्रमाणे पूर्णपणे स्वतंत्र स्वरूपात उभारण्यात येणार असून विद्यमान पनवेल-दिवा-वसई मार्ग देखील कायम ठेवला जाणार आहे.या मार्गामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे.
भिवंडी परिसरातील वस्त्रोद्योगाला याचा विशेष फायदा होईल. हजारो कामगारांना कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय नवी मुंबई, रायगड , पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाढणारे औद्योगिक प्रकल्प या नव्या मार्गामुळे अधिक गतिमान होतील. परिणामी रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होतील.या मंजुरीसोबतच बदलापूर-करजत दरम्यान तिसरी रेल्वे लाईन व असंगाव-कसारा दरम्यान चौथी लाईन उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकल्पांवर अनुक्रमे 1 हजार 325 कोटी रुपये आणि 871 कोटी रुपये खर्च होणार आहे. एकूण पाहता या सर्व उपक्रमांचा खर्च तब्बल 14 हजार 907 कोटी रुपये इतका असून मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत ही गुंतवणूक ऐतिहासिक ठरणार आहे. हा मार्ग केवळ प्रवासाला दिलासा देणारा नसून तो उपनगरी मुंबईच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही गती देणारा ठरणार आहे. पनवेलहून बोरीवली व वसईपर्यंतची थेट जोडणी उपलब्ध झाल्याने पूर्व-पश्चिम दळणवळणाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हा मार्ग उपनगरी रेल्वे जाळ्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. बोरीवली आणि वसई या दोन्ही टोकांशी जोडणी झाल्याने प्रवाशांची सोय तर होईलच, पण भविष्यातील वाहतुकीच्या गरजाही पूर्ण होतील. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
पनवेल-बोरीवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग हा विशेषतः भिवंडी परिसरासाठी वरदान ठरणार आहे. वस्त्रोद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा हातभार लागेल. ही मागणी मी गेली दोन दशके सातत्याने मांडत होतो, ती अखेर पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.
राजीव संघल, सदस्य, पश्चिम रेल्वे प्रवासी सल्लागार समिती.