

खानिवडे: वसई पूर्वेतील शिरसाड नाक्यावर एक भरधाव कार समोरील वाहनाला पाठीमागून धडकली आणि अपघात घडला. मात्र धडक देणाऱ्या कारमध्ये अत्यंत दाटीवाटीने केली जाणारी गोतस्करी उघड झाली. पहाटे घडलेल्या या घटनेतील गोतस्करांना मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,बुधवारी (दि.१७) पहाटे एक भरधाव कार महामार्गावरील शिरसाड भगत जात असताना तिची एका वाहनाला धडक लागली. त्या धडकेत ती कार थांबली असताना त्यात ५ गाई दाटीवाटीने भरलेल्या दिसून आल्या. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे येथील स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी पोलिसांना ही खबर दिली. एक मोठी गाय आणि चार बछडे यांची सुटका करून पोलिसांनी कारसह कार चालकाला व आणखी एकाला जागेवरून ताब्यात घेतले. मात्र यातील एक बाजूच्या झाडीत पळून गेला होता. त्याला स्थानिकांनी हुडकून काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूण तिघांना याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरातून अत्यंत संताप व्यक्त करण्यात आला.
शेजारील गावचे नागरिकांनी सांगताना असे सांगितले की, कायदे करूनही गोतस्करी थांबत नाही. तर कायदा आम्हाला हातात घेता येत नाही . यामुळे एका बाजूने आम्हला अत्यंत पूजनीय असलेल्या गो मातेवर हल्ला होत आहे. तर दुसऱ्या बाजूने आम्ही कायद्याचे पालन करतो म्हणून उघड्या डोळ्यांनी निमूटपणे सहनशील राहावे लागते. आमच्या शेजारून जाणाऱ्या महामार्गावरून रोजच गो तस्करी होत आहे.
अगदी भर श्रावण महिन्यात तेही सोमवारी रात्री खानिवडे गावातील भरवस्तीतून इंजेक्शन देऊन कारमधून गोतस्करी झाल्याचे सी सी फुटेज समोर आले होते. त्याची तक्रार मांडवी पोलिसांत दाखल आहे. मात्र अद्याप त्याचा मागोवा घेण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. तर आलिशान व प्रवासी कार मधून होणारी ही गो तस्करी पोलीस व इतर यंत्रणांना चकवा देणारी ठरत आहे. यामुळे अधिक सक्षम उपाय योजना करून महामार्गावरील गोतस्करी थांबवावी. तसेच मध्यरात्र ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान गोतस्करीच्या घटना ह्या वसई तालुक्यातून उघड होत आहेत. त्यामुळे गाव खेड्यांत मध्यरात्र ते पहाटे चार अश्या ४ तासांच्या वेळेत पोलिसांनी परिसरात या भागात त्यांची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.