Fourth Mumbai impact on Palghar : चौथ्या मुंबईमुळे पालघरला वेगळे वैभव प्राप्त होणार

रोजगार निर्मितीसाठी चौथी मुंबई ठरणार आश्वासक; वाढवण बंदरामुळे मिळणार जागतिक ओळख
Fourth Mumbai impact on Palghar
चौथ्या मुंबईमुळे पालघरला वेगळे वैभव प्राप्त होणारpudhari photo
Published on
Updated on
पालघर ः निखिल मेस्त्री

राज्य सरकारने तिसर्‍या मुंबई पाठोपाठ चौथ्या मुंबईची घोषणा केली असून ही चौथी मुंबई महाराष्ट्रातील नवे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात तयार करण्याचा आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत तयार केला जात असून तिसर्‍या मुंबईच्या मानाने ही मुंबई दळणवळणाच्या व विकासात्मक दृष्टीने सक्षम असणार आहे.

भारतातील सर्वात मोठ्या अशा वाढवण बंदरामुळे चौथ्या मुंबईला जागतिक महत्व प्राप्त होणार आहे. रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून चौथ्या मुंबईकडे पाहिले जात आहे. रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई तर पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई आकार घेणार आहे. त्यामुळे हे दोन्ही जिल्हे विकासाच्या केंद्रस्थानी येणार आहेत.

या दोन्ही जिल्ह्यात औद्योगिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. पालघर व रायगड हे दोन्ही जिल्हे मूळ मुंबईला लागून असल्याने या जिल्ह्यांच्या शहरीकरण विस्तारालाही बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी बंदर प्रकल्प वाढवण अर्थात हरित वाढवण बंदर प्रकल्प पालघरच्या डहाणू तालुक्यात उभारला जाणार आहे. जगातील दहा बंदरांच्या यादीत हे बंदर समाविष्ट होणार आहे. वाढवण बंदराचे काम पूर्ण होता होता, याच परिसरात विमानतळ, अद्ययावत रस्ते, समृद्धी जोडमार्ग, मुंबई-वडोदरा महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली समर्पित रेल्वे मालवाहतूक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, कोकण महामार्ग अशी दळणवळणाची सुविधायुक्त व सक्षम साधने पालघर जिल्ह्यात उभी राहणार आहेत. त्यामुळे हे बंदर चौथ्या मुंबईशी संलग्न व वाढवण परिसरात उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

चौथी मुंबई ही मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसित करण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईला चांगला पर्याय ठरणार आहे. तिसर्‍या मुंबईच्या मानाने वाढवणभोवती उभारण्यात येणारी चौथी मुंबई ही सर्वंकष विकासाच्या दृष्टीने उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरामुळे या नवीन शहरामध्ये विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून त्या दृष्टीने एका नव्या शहराचा विकास वाढवण बंदराभोवती शक्य आहे. राज्य सरकारने यापूर्वी वाढवण विकास केंद्र क्षेत्र जाहीर केले होते. सुरुवातीच्या काळामध्ये या विकास केंद्रामध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती.

महामुंबईतील चौथी मुंबई पालघरमधील 107 गावांमध्ये

मुंबई महानगर प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे क्षेत्र विस्तारण्यात येणार असून या अंतर्गत ही चौथी मुंबई समाविष्ट केली जाणार आहे. नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष ठेवले असून त्या अंतर्गत महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब उभारली जाणार आहेत. वाढवण हे त्या अंतर्गत एक क्षेत्र आहे. वाढवण बंदराच्या परिघांमध्ये येत असलेल्या 107 गावांमधील 512 चौरस किलोमीटरच्या परिसरात ही चौथी मुंबई विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून रस्ते विकास महामंडळामार्फत तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ही मुंबई गुजरात सीमेच्या महाराष्ट्रातील तलासरीपर्यंत विस्तारली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news