

पालघर शहर : राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागामार्माफत माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून पर्यटक आणि भाविकांसाठी कोकण दर्शन टूर आयोजित करण्यात आली आहे. पालघर जिल्हयातील भाविकांना कोकणातील प्रसिद्ध देवस्थाने आणि ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवून आणण्यासाठी हे नियोजन करण्यात आले असून यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या सवलतींचा पूर्ण लाभ मिळणार आहे.
पालघर एसटी प्रशासनामार्फत पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा अशा आठही आगारातून कोकण दर्शनाकरिता या बस नियोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून 40 प्रवाशांचा गट तयार झाल्यास, त्यांच्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शवली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांना आपल्या जवळच्या आगारातून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
ही सहल निसर्गरम्य कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. यामध्ये ऐतिहासिक दुर्गभ्रमंतीमध्ये मुरुड जंजिरा किल्ला आणि रायगड किल्ल्याचा समावेश आहे. यासह संगमेश्वर, मार्लेश्वर आणि प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित आगारातून सुटणाऱ्या बसचा मार्ग मुरुड जंजिरा - माणगाव - रायगड - संगमेश्वर - मार्लेश्वर - गणपतीपुळे आणि परतीचा प्रवास असा असणार आहे.
22 जानेवारी रोजी गणेश जयंती असून पार्श्वभूमीवर भाविकांना गणपतीपुळे येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी हे नियोजन आहे. या सहलीसाठी कोणताही ठराविक कालावधी बंधनकारक नसून, प्रवाशांच्या मागणीनुसार तारीख आणि वेळ ठरवली जाणार आहे. या पॅकेज टूरसाठी ग्रुप बुकिंग असूनही शासनाच्या सर्व सवलती लागू आहेत. यामध्ये महिला सन्मान योजने अंतर्गत तिकीट दरात 50 टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक (75 वर्षांवरील) 100 टक्के मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना (65 ते 75 वर्षे) नियमानुसार 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.