

पालघर: शहरात शनिवारी (दि.१४ मार्च) दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना मालगाडीने दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पालघर परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
पालघर पूर्वेतील जुन्या पालघर भागात असलेल्या जैन मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. स्वप्निल शैलेश पालांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते. रेल्वे रुळावरून जात असताना समोरून येणाऱ्या मालगाडीचा अंदाज न आल्याने तिघेही तिच्या कचाट्यात सापडले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नातेवाईकांचा असा दावा आहे की, अपघाताच्या काही वेळ आधी काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले होते. पोलिसांनी या तरुणांना मारहाण केली. दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या भीतीपोटी तरुण सैरावैरा धावू लागले आणि त्याच गडबडीत ते रेल्वे रुळावर गेले.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी (GRP) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळले नसले तरी, "तपास पूर्ण झाल्यावरच अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल," अशी भूमिका घेतली आहे.