

पालघर ः पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्या आणि दोन ग्रामपंचायतींचे सरपंच, युवा सेनेचे पदाधिकारी गुरुवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश घेतला.भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत आणि बाबाची काठोले यांच्या नेतृत्वाखाली दोनशे पेक्षा अधिक वाहने महामार्गा वरील भगत तारांचंद हॉटेल येथून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निवडणुकी आधी भाजपने शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँगेसच्या पदाधिकार्यांचा प्रवेश देऊन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम, पूर्णिमा धोडी, कमळाकर दळवी,शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच घनश्याम मोरे, सरावली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंद धोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरेंद्र पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या नरिमन पॉईट येथिल पक्ष कार्यालयात प्रवेश घेतला.
शिवसेनेच्या आदिवासी आघाडीचे राज्य प्रमुख जगदीश धोडी यांचे पुतणे सरावलीचे विद्यमान सरपंच आनंद धोडी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांचाही भाजप प्रवेश झाल्याने जगदीश धोडी यांना धक्का बसला आहे.आनंद धोडी यांच्या सोबत सहा ग्रामपंचायत सदस्य भाजप मध्ये प्रवेश केल्याने तारापूर औद्योगिक वसाहती लगतच्या महत्वाच्या सरावली ग्रामपंचायती वर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे.
शिरगांव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच घनश्याम मोरे तसेच ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य कमळाकर दळवी,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालघर शहर अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांचा भाजप प्रवेश झाला आहे.वीरेंद्र पाटील यांची कन्या हिंदवी पाटील पालघर नगर परिषदे च्या माजी नगर सेविका आहेत.
भाजप मध्ये प्रवेश करणार्यांची यादी
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम
माजी युवा सेना लोकसभा समन्व्यक रिकी रत्नाकर
सरावली ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद धोडी माजी जिल्हा परिषद सदस्या पूर्णिमा धोडी
सरावली ग्रामपंचायतीचे सहा सदस्य
शिरगांव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच घनश्याम मोरे
ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य कमळाकर दळवी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालघर शहर अध्यक्ष वीरेंद्र पाटील
माझ्या पक्षाने मला मान दिला परंतु विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढताना माझ्या सोबत गद्दारी केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्याने भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह प अध्यक्ष पदावर असताना केलेल्या कामांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांच्या नेतृत्वात भाजप मध्ये काम करणार आहे.
प्रकाश निकम
शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने डावलले जात होते. जिल्हा प्रमुख बोईसर मध्ये येऊन बैठका घेत असताना आम्हाला बैठकिला बोलावण्यात येत नव्हतं.वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्यानंतर निराकरण होत नव्हते.सातत्याने होत असलेल्या अपमानाला कंटाळून मी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या पूर्णिमा धोडी भाजप मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आनंद धोडी, सरपंच सरावली ग्रामपंचायत.