पालघर : मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे (महालक्ष्मी ) येथील उड्डाण पुलावर एका वाहनाला आग लागली लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वा. गुजरात वरून मुंबई दिशेला नवीन चारचाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये आंतरिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.
गुजरात कडून मुंबई दिशेला नवीन चार चाकी वाहने घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे. वाहनात विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असून आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन बाजूला करून स्वतःचा जीव वाचवला आहे. अगदी काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून अग्निशामक दल पोहोचण्यासाठी वेळ झाल्यामुळे ट्रक आणि आतील नवीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्गावरील महामार्ग पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ढिसाळ नियोजन अभावी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या जवळपास पाच किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्याही मार्गावर वाहने विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे सहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी असल्याने संध्याकाळच्या वेळी जाणाऱ्या कामगारांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.