

पालघर : जनता दरबार असो आढावा बैठक असो की, मग नियोजन समितीची बैठक असो समोर उपस्थित झालेल्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देऊन मोकळ व्हायचं किंवा एखाद आश्वासन द्यायचं आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे ठेवायची अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक विभागांची झाल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पालकमंत्र्यांना आश्वासन देवूनही याबाबत उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वसामान्य नागरिक सोडा पालकमंत्र्यांना दिलेली आश्वासन सुद्धा जर हे विभाग पाळणार नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होईल याची कल्पना न केलेली बरे. पालघर जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची बैठक झाली यामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल की पालघर ते त्र्यंबकेश्वर पर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्ग असेल यावर दीर्घ चर्चा झाली.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते सुद्धा खूप खराब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याला राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी "साहेब काम आजच सुरू झाले असून मनोर पर्यंत खड्डे बुजवले देखील आहेत त्या पुढचे रस्ते सुद्धा बुजून येथे काम सुरू असल्याचे उत्तर दिले होते. मात्र आज १५ ते १७ दिवस होऊन गेलेले असताना सुद्धा मनोर ते विक्रमगड आणि विक्रमगड ते त्र्यंबकेश्वर घाटापर्यंतच्या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नुकतेच मोखाडा ते निळमाती या रस्त्यावरील निळ माती जवळील खड्डे चुकविण्याच्या नादात एका मोटरसायकल चालकाचा अपघात होऊन त्याचा मृत्यू देखील झाला. असे दररोजचे किरकोळ अपघात त्र्यंबकेश्वर घाटात होताना दिसून येतात याशिवाय विक्रमगडच्या केव ते मनोर पर्यंत च्या रस्त्यावर कोणतीही गाडी असली तरी ती १५ ते २० च्या स्पीडच्या पुढे चालू शकत नाही अशी भयान परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे. यामुळे अनेकदा वाहन चालक त्रस्त आहेत.
एवढेच काय जर पाऊस नसेल तर धुळीने आणि पाऊस असेल तर चिखलाने मोटरसायकल वाहन आणि चार चाकी वाहन चालक-मालक सुद्धा हैरण झालेले असताना एवढ्या मोठ्या महत्त्वाचा, ज्या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग मध्ये समावेश झालेल्या रस्त्याची जर ही परिस्थिती असेल तर बाकी ग्रामीण रस्त्यांची अवस्था काय असेल असा प्रश्न येथे सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे याविषयी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अनेकदा प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नियोजन समितीच्या बैठकीत सुद्धा यावर चांगली चर्चा झाली मात्र अशावेळी महामार्ग विभागाकडून पालघर ते त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या या रस्त्यांच्या खड्डे बुजवायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात पालघर ते मनोर पर्यंत कसेबसे खड्डे बुजविण्यात आले त्या पुढील खड्डे जैसे थे असल्याचे आता दिसून येत आहे.