

दीपक गायकवाड
खोडाळा
गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच गायब झाल्याने वातावरणात एकदम उष्मा निर्माण झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मोखाडा तालुक्यात किमान तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटसारखा फील येत आहे. उन्हाचे चटके बसत आहेत.
गेल्या महिन्यात पावसाची संततधार कायम असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परिणामी कमाल आणि किमान तापमानात घट झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस गायब झाल्याने तालुक्यात प्रचंड उष्मा वाढला असून उन्हाचा जोरदार तडाखा बसत आहे. आठ दिवसांपूर्वी कमाल तापमान जवळपास २५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत कमाल आणि किमान तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दोन्ही तापमानांत वाढ झाल्याने वातावरण अधिक उष्ण झाले आहे. मुळात हवेतील आर्द्रता आणि ओलावा कमी झाल्याने उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.
सध्याच्या उष्णतेमुळे नागरिक घामाघूम होत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच जाणवणारा हा उष्मा म्हणजे ऑक्टोबर हिटची चाहूलच वाटत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे शीतपेयांची मागणी वाढली आहे. मात्र, उष्णता वाढली असली तरी सर्दी-खोकल्याच्या धास्तीमुळे कोल्ड्रिंक्स पिण्यास फारसे कुणी धजावताना दिसत नाही. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाने थोडीशी उघडीप घेताच वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. मंगळवार, बुधवारीही नागरिकांना उन्हाचे चटके बसले. राज्यात अद्यापही काही ठिकाणी पाऊस पडत असला तरी अनेक भागांत त्याने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर हवामानाने अचानक कूस बदलली असून, या बदलामुळे सप्टेंबरमध्येच नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला आहे.
एल निनोचा तीव्र प्रभाव असल्यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून, सध्या तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यातच पावसाने काही काळ दांडी मारल्याने आणि महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणातील तापमान टिकून राहिले आहे. त्यामुळे सर्वत्र उष्णतेचा परिणाम जाणवत आहे.
रिजवाना सय्यद, कृषी व हवामान तज्ज्ञ - कोसबाड (डहाणू)
मागील एक ते दीड महिन्यापासून संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दररोज दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभागात औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ७० टक्के रुग्ण संसर्गजन्य आजारांचे असतात. वातावरणातील दमटपणा कमी होऊन वातावरण पूर्णतः कोरडे झाल्याशिवाय रुग्णसंख्येतील ही वाढ आटोक्यात येणार नाही.
डॉ. भारतकुमार महाले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मोखाडा