पालघर : पालघर जिल्हा परिषदेमध्ये मानधन तत्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात भरून निघाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी याचा निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियुक्त पत्र देताना केले. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत वर्षभापासून प्रलंबित असलेली मानधन तत्वावर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हा परिषदेने ८२१ शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
शासनाचे मार्गदर्शन प्राप्त करून पालघर जिल्ह्यातील पेसा व अन्य प्रवर्गातील पात्र उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावरील शिक्षक भरती देखील लवकर केली जाईल असेही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी यावेळी सांगितले. आदिवासी क्षेत्रामध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर नियुक्त्या करण्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार मानधन तत्वावर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र देते- वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ज्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे असे शिक्षक त्यांच्या नेमणुकीच्या शाळेवर हजर झाले. या नेमणुका सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाला अधीन राहून देण्यात आले आहेत. नेमणूक काम केलेल्या शाळांवर प्रामाणिकपणे अध्यापन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व बुद्धिमत्ता वाढण्यासाठी या शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी आवाहन केले तर शिक्षण समिती सभापती पंकज कोरे यांनी शिक्षणाचा दर्जा वाढण्याकडे लक्ष देण्याचे यावेळी नियुक्त केलेल्या शिक्षक वर्गाला सांगितले.