वसई : कंबोडिया येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पालघर डिस्ट्रिक्टच्या ३ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३ पदके मिळवली. ह्या स्पर्धेमध्ये २४ देशांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये भारत ५ व्या स्थानावर होता. भारताला ६ सुवर्ण, १२ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण २७ पदकांची कमाई झाली. यासाठी पालघर डिस्ट्रिक्टचेही योगदान महत्त्वाचे आहे. ही स्पर्धा दि. ६ ते १३ ऑक्टोवर यादरम्यान आयोजित केली होती. पालघर डिस्ट्रिक्ट किकबॉक्सिंग असोसिएशनचे हे सर्व खेळाडू आहेत. वर्ल्ड रेफ्री म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्य प्रशिक्षक सेन्सई सूर्यप्रकाश मुंडापट आणि प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. कंबोडिया येथे झालेल्या ह्या स्पर्धेत सायली कान्हात हिने १ सुवर्ण व १ रौप्य तर अमन पवार याने १ रौप्य पदक मिळविले. सिद्धांत मुंडापट याने सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
यशस्वी खेळाडूंनी त्यांचे प्रशिक्षक संतोष अग्रवाल, वाको इंडिया आणि वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष नीलेश शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक नीलेश शेलार आणि सिद्धार्थ भालेगरे यांचे संपूर्ण स्पर्धेत मिळालेल्या सततच्या पाठिंब्यासाठी विशेष आभार व्यक्त केले आहेत. या यशाबद्दल वसई- विरारचे मुख्य संरक्षक आफीफ शेख तसेच कला-क्रीडा समितीचे प्रमुख प्रकाश वनमाळी यांनी आनंद व्यक्त करून मुलांचे कौतुक केले आहे. वसई-विरार महापालिका आणि आ. हितेंद्र ठाकुर यांनीही या खेळाडूंसाठी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. खेळाडूंना प्रशिक्षणासाठी मोलाचे योगदान व कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देणारे सहजीवन हॉलचे प्रमुख ओनिल आल्मेडा, लोकसेवा मंडळाचे प्रमुख गॉडफ्री सर आणि क्षेत्रपालेश्वर मंदिराचे प्रमुख सुहास जोशी यांचेही विशेष आभार मानले. पालघर डिस्ट्रिक्ट किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश त्यांच्या परिश्रमाचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. भविष्यातही हीच कामगिरी कायम राहील अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.