

पालघर : पालघर नगरपरिषदेचा 21.37 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी अर्थसंकल्प सादर केला.
आगामी आर्थिक वर्षात नगरपरिषदेला 304.67 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून महसुली व भांडवली खर्चाच्या अनुषंगाने 283.30 कोटी रुपये खर्च होणार असून सन 2026- 27 करीता 21.37 कोटी रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला कौन्सिलने मान्यता दिली आहे.
पालघर शहरातील विकास कामांना गती मिळण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी नगरपरिषदेने आगामी आर्थिक वर्षात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.पालघर नगरपरिषदेची स्थायी समिती तसेच सर्वसाधारण बैठक नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
पालघर नगरपरिषदेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र शुल्क, घरपट्टी, पाणीपट्टी, फायर एनओसी इत्यादी शुल्क तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.घरपट्टी सर्वेक्षणासाठी गेल्या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपयांची असलेली तरतूद आगामी आर्थिक वर्षात 9 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मालमत्ता करामध्ये 40 टक्के वाढ होण्याचे अपेक्षित असताना सन 2008 पासून नगरपरिषदेने शहरांमधील मालमत्तेचे पुनर्मुल्यांकन झालेले नाही.नगरपरिषदेच्या आर्थिक नुकसानीवर आळा घालण्यासाठी नगरपरिषदे कडून नव्याने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया निर्णय घेण्यात आला आहे.
15 वित्त आयोग, केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना, दलित वस्ती, अल्पसंख्यांक सुधारणा, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, रस्ते अनुदान तसेच जिल्हा नगरोत्थान अनुदाना अंतर्गत निधी मिळण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण तसेच हॉकर, हातगाड्या फेरीवाले व इतर विक्रेत्यांकडून व्यापली जाणारे रस्ते कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले. याबाबत अधिकारी वर्गांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे या बैठकीत पुढे आले.
आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे रुंदीकरण काम हाती घेण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आवश्यक यंत्रणेसह या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पालघर नगरपरिषद हद्दीत कचरा वनियमितपणे उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग तसेच गोळा होणारा कचरा एकत्रितपणे कचराभूमीत टाकला जात नसल्याने ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा सुर बहुतांश नगरसेवकांनी बैठकीत व्यक्त केला. ठेकेदाराला मुदतवाढ न देता याकामी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.निविदा प्रकिया पूर्ण होईपर्यंत जुन्या ठेकेदारामार्फत काम सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले.
पालघर शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी विशेष यंत्र खरेदी करण्याचे तसेच कचराभूमीत साचलेल्या सुमारे 90 हजार टन कचऱ्याचे बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट करण्याचे निश्चित करण्यात आले. कचराभूमीत विविध कामांसाठी पाण्याची आवश्यकता भासत असून भूगर्भातील पाण्याची शुद्धता कायम राहावी, यासाठी टेंभोडे येथील तलावाजवळ कुपनलिका खोदून जलवाहिनीद्वारे कचराभूमीपर्यंत पाण्याची व्यवस्था उभी करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
शहरातील स्मशानभूमीत पर्यावरण स्नेही पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी सौरऊर्जेच्या वापराद्वारे अंत्यविधी करण्याचे तंत्रज्ञान बसवण्याचे ठरवण्यात आले. यामुळे 100 किलो लाकडांमध्ये मृतदेहाचे दहन करणे शक्य होणार आहे. याचप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठी दहन व्यवस्था करण्याची यंत्रणा खरेदीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नगरपरिषद हद्दीत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.