पालघर : मुंबईतील नरिमन पॉईंट येथून कोस्टल रोडचा विस्तार आता विरारपर्यंत केला जाणार आहे. या मार्गामुळे १ तास २० मिनिटांचा प्रवास ३५ ते ४० मिनिटांत करता येणार आहे. या मार्गासाठी जपान सरकार कोट्यवधी रुपयांची मदत करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सुतोवाच केले होते.
मुंबईतील नरिमन पॉईंट ते कोस्टल रोडचे बांधकाम पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवले जाणार आहे. जाईल, विरार शहर मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. जपान सरकार कोस्टल रोड पुढे विरारपर्यंत वाढवण्यासाठी ५४००० कोटी रुपये देणार आहे. तर दुसरीकडे वर्सोवा ते मढ लिंकपर्यंतचं टेंडर आधीच जारी करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मढ ते उत्तन लिंकपर्यंतचं काम आता सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील ८ लेनचा असणार असून तो २९.२ किमी लांबीचा वेगळा एक्स्प्रेस-वे आहे. हा एक्सप्रेस-वे दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना एकत्र जोडतो. याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ११ मार्च २०२४ रोजी करण्यात आले आहे. प्रिंसेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते बांद्रा - वरळी सी लिंकपर्यंत १०.५८ किमी इतका लांब आहे.
मार्च २०२४ मध्ये वरळी आणि दक्षिण मुंबईमध्ये मरिन ड्राईव्हदरम्यानच्या १०.५ किमी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या मार्गासाठीचे काम १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू करण्यात आले होते. यासाठी १२,७२१ कोटी रुपये खर्च आला आहे. मार्ग खुला केल्याच्या पहिल्याच दिवशी १६ हजारहून अधिक वाहनांनी या मार्गाचा प्रवासासाठी वापर केला होता.
आता वांद्रे ते विरारपर्यंत जोडणाऱ्या समुद्री मार्गासाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. कोस्टल रोडचा विस्तार आता वसई-विरारपर्यंत केला जाणार आहे. वर्सोवा- विरार सी लिंकची निर्मिती एमएमआरडीए कडून केली जात आहे. या ४३ किमी लांबीच्या रोडसाठी ६३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.