

पालघर : चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने तिच्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सात वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर शहरानजीक काशीपाडा परिसरात घडली आहे. चिन्मय धुमडे असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी आई पल्लवी धुमडे हिच्या विरोधात पालघर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर शहरानजीक असलेल्या जुना सातपाटी रस्त्यावरील काशीपाडा येथे पतीशी पटत नसल्याने पल्लवी धुमडे (40) ही महिला तिचा मुलगा चिन्मय (7) आणि मुलगी लव्या (10) या दोन मुलांसोबत तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. शुक्रवारी रात्रीच्यावेळी चिन्मय आणि लव्या या दोनही मुलांनी आई पल्लवी हिच्याकडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट धरला. नवरात्र सुरू असल्याने उपवास आहेत. त्यामुळे चिकन लॉलीपॉप मिळणार नाही, असे आईने दोनही मुलांना सांगितले. यावेळी दोन्ह मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी आईकडे हट्ट धरला. मुलांनी हट्ट धरल्याने आई पल्लवीचे तिच्या रागावर नियंत्रण राहिले नाही.