

खोडाळाः मोखाडा तालुक्यातील गोमघर नजीक गोमघरच्या सपाटीला दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे.दोन्हीही मोटारसायकल वेगात असल्याने टक्कर इतकी भिषण होती की यात मोटारसायकल वरील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झालेल्या होत्या.यातील दोघांचा मृत्यू झाला असून इतर तीघे गंभीर जखमी झालेले आहेत.
याबाबत खोडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहापूर तालुक्यातील विहीगांव येथून गोमघर मार्गावरून वाडा बाजूकडे एम् एच् 04 एल यु 8286 या युनीकॉन मोटारसायकल ने लक्ष्मण अशोक गांगड 28,दिलीप गांगड 29,व देवीदास कृष्णा गांगड 30 वर्षं हे तीघे सकाळी 11-30 वाजता जात असताना गोमघर पैकी बोट्याचीवाडी येथील अनील यशवंत सवरा हा आपल्या वडीलांना घेण्यासाठी मोटार सायकल क्रमांक एम् एच् 15 एफ् वाय 9327 या गाडीने येत खोडाळा येथे येत असताना दोन्हीही गाड्यांची समोरासमोर भिषण टक्कर झाली असून यात लक्ष्मण गांगड, विहीगाव व अनील यशवंत सवरा, बोट्याचीवाडी या दोघांचा मृत्यू झाला आहे तर इतर तीघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बालवयीन दुचाकीस्वारांना लगाम कोण लावणार.?
मोटार सायकल स्वार हे वेगावर नियंत्रण ठेवून चालवत नसल्याने अशा दुर्घटना घडत असतात.त्यातच खोडाळा येथील बाजारपेठेतही व्यापाऱ्यांची अल्पवयीन नव्हे तर बालवयीन मुले बिनधास्त बाजारपेठेतून दुचाकीवरुन सवारी करत असतात तर काही हौशी पालक आपल्या पाल्यांच्या हातात थेट चार चाकीचे स्टेअरींग देत असल्याने आश्चर्य वाटते. मात्र अनावधानाने किंवा पुरेशी समज नसल्याने कोणतीही संभाव्य अनूचित घटना घडून अपघाताला निमंत्रण दिले जाण्याचा धोका टाळता येणार नाही.मात्र दस्तूरखुद्द पालकच पाल्यांच्या हट्टाला खतपाणी घालत असल्याने मोखाडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांनाच या अवाजवी लाडाला वेसन घालून बालकांना दुचाकी सवारीपासून रोखत पालकांचे समूपदेशन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
शव वाहीनीची गरज अधोरेखित....
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण आहे.या भागात मोठ्या प्रमाणावर आकस्मिक घटना घडून प्रसंगी जीवीतहानीही घडत असते. मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वताची शववाहीनी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात शव आणणे अथवा पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी शव पाठवणे अडचणीचे ठरत असते. त्यामूळे स्थानिक आमदार, खासदार महोदयांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक ठरत आहे.