

दीपक गायकवाड
खोडाळा : मोखाडा तालुका हा प्रामुख्याने कुपोषण, स्थलांतर, पाणीटंचाई यासारख्या समस्यांनी लोकमाणसांत कुपरिचित राहिलेला आहे.आत्ता समस्यांमध्ये वीजेची आणि दुरध्वनी बरोबरच भ्रमणध्वनीच्या कायमस्वरूपी पाठशिवणीच्या खेळाची भर पडली आहे. मोखाडा तालुक्यात वीज पुरवठा खंडीत होताच भ्रमणध्वनी सेवेचाही समूळ बोजवारा उडत आहे.
परिणामी अतिवृष्टीमधील आपत्कालीन परिस्थितीत मोखाडा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांसह खेडी पाडी अक्षरशः संपर्क विहिन झालेली आहेत.मात्र ही तळागाळातील जीवनमानाशी निगडीत असलेली समस्या मोबाईल कंपन्या आणि तालुक्यातील कर्त्या धर्त्या लोकप्रतिनिधींच्या खिजगणतीतही नसल्याने तालुक्यात एकूणच ऑल इज वेल असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोखाडा तालुक्यात दुरध्वनी सेवा अगोदरच कुचकामी ठरलेली आहे.त्यातच खाजगी मोबाईल सेवेबरोबरच बी एस् एन् एल सारखी सरकारी सेवाही कुचकामी ठरलेली आहे.त्यातच महावितरणची बत्ती गुल होताच भ्रमणध्वनी सेवा तात्काळ बंद पडत असल्याने आपत्ती व्यवस्थापन आणि त्याशिवाय अनेक शासकीय सेवांना त्याचा मोठा फटका बसत असून कुठे एखादी आपत्ती उद्भवली तर वेळीच संपर्क न झाल्यास तालुक्यात मोठी दुर्धर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भ्रमणध्वनी टॉवर कडे बॅटरी बॅकअप, डिझेल जनरेटर व पॉवर सप्लाय सिस्टम सक्षमपणे कार्यान्वित नसल्याने मुख्य वीज पुरवठा बाधीत होताच निमीषार्धातच जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बी एस् एन् एल सेवा तातडीने कोलमडत आहे.तथापी एअरटेल,जीओ आणि बी एस् एन् एल सेवांनी मोखाडा तालुक्यातील भ्रमणध्वनी टॉवरच्या सक्षमीकरणाबाबत कमालीचा बेजबाबदारपणा दाखवला आहे.व स्थानिक लोकप्रतिनिधीही या अत्यावश्यक सेवेबाबत मुग गिळून बसलेले आहेत.परिणामत: भ्रमणध्वनी सेवा आजघडीला कुचकामी ठरलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा प्रामुख्याने डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांनी आणि दाट जंगलांनी व्यापलेला दुर्गम आदिवासी बहुल भाग आहे.त्यामूळे येथील, आरोग्य , दळणवळण, संपर्क सेवा या सारख्या महत्वपूर्ण सुविधा सक्षमपणे कार्यान्वित असणे हा येथील जनतेचा अधिकार आहे.परंतु तालुक्याचे मुख्य ठिकाण मोखाडा हे समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० फूट उंचीवर वसलेले असले तरी समूद्र सपाटी पासून १६०० फुट उंचीवर असलेला हा तालुका त्यापेक्षा दुप्पटीतिपटीने समस्यांच्या गर्तेत खोल रुतलेला आहे.ही येथली शोकांतिका आहे.
आंतरजाल समस्या तीव्र
खोडाळा आणि परिसरात नो नेटवर्कने ग्रामीण आदिवासी पट्ट्यातील ग्राहकवर्ग अतिशय बेजार झाला होता. बीएएनएलच्या नन्नाच्या पाढ्याला अक्षरशः कंटाळुन येथील ग्राहकवर्ग केवळ नाविलाजास्तव खाजगी सेवेकडे वळला आहे. ही बाब लक्षात घेऊन अखेर बी एस् एन् एल् ने मौजे सायदे, कोचाळे, सूर्यमाळ, सावर्डे, करोळ, कारेगाव, काष्टी, आमला या ८ ठिकाणी बी एस् एन् एल् चे टॉवर उभे केले असल्याचा सार्वजनिक उहापोह करत बी एस् एन् एल् चे मुळ ग्राहक पुन्हा बी एस् एन् एल् कडे आकृष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.परंतु त्याउपरांतही भ्रमणध्वनी सेवेत काडीमात्रही बदल झालेला नाही.आजही त्यांचे आंतरजाल धिम्या गतीने सेवा देत असल्याने ग्राहकवर्ग कमालीचा नाराज आहे.
जनआंदोलनाचा इशारा
याबाबत खोडाळा ग्रामपंचायत चे उपसरपंच उमेश येलमामे यांनी भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली असून पावसाळा, अतिवृष्टी, दुरस्थ सेवा आणि तळागाळातील जनतेची निकड लक्षात घेऊन मोबाईल कंपन्यांनी भ्रमणध्वनी टॉवर वरुन सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा येलमामे यांनी मोबाईल कंपन्यांना दिला आहे.