

मोखाडा : तालुक्यातील अतिदुर्गम अशा काष्टी गावातील आनंद सनू भला या आदिवासी बांधवाच्या राहत्या घराला शुक्रवार दि ८ रोजी सायंकाळी ६-३० च्या दरम्यान भिषण आग लागली.या आगीत त्यांचे कपडे, अंथरूण पांघरूण आणि साठवलेले धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली हकीकत अशी की, काष्टी येथील कायमचे रहिवासी असलेले आनंद सनू भला हे पत्नी मीना आनंद भला (वय 42), मुलगा विजय आनंद भला (वय14) व मुली ममता आनंद भला ( वय 7),सुरेखा आनंद भला (वय 6),सोनाली अनंता भला (वय 3) व गौरव अनंता भला (वय 5 ) असे एकूण 7 लहान मोठी माणसं शेतावर बांधलेल्या घरात राहत होते.
कृषी विभागाने लागवड करुन दिलेल्या फळबागेची निगराणी करण्यासाठी भला हे कुटुंब कबील्यासह शेतावर बांधलेल्या घरात वास्तव्य करून होते. मात्र अचानक लागलेल्या आगीत त्यांनी उभा केलेला संसार अक्षरशः उध्वस्त करून टाकला असून त्यांचे पूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.
शासनाने आमच्या नुकसानीची वस्तूनिष्ठ पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी व आमचा आगीमुळे अक्षरशः पालापाचोळा सारखा जळून गेलेला संसार आम्हाला पून्हा उभा करुन द्यावा हीच मायबाप सरकारला विनंती.
आनंद सनू भला , नुकसान ग्रस्त आदिवासी बांधव , मौजे काष्टी,ता.मोखाडा