

Mokhada Chaufuli Bus Stop
खोडाळा : डहाणू–जव्हार–मोखाडा–त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील मोखाडा चौफुली हा महत्त्वाचा मध्यवर्ती बसथांबा असून, येथे सार्वजनिक प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याने महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मोखाडा चौफुलीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बससह विविध खासगी वाहने नियमित थांबतात. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो भाविक, पर्यटक, वारकरी आणि प्रवासी प्रवास करतात. त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, सप्तशृंगी गड आणि शनि शिंगणापूर या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो.
प्रवाशांच्या अल्पोपहार व विश्रांतीसाठी मोखाडा चौफुली हे प्रमुख ठिकाण असले तरी येथे स्वच्छतागृह अथवा प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी, विशेषतः महिला प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जाण्याची वेळ येत असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याच ठिकाणी मोखाडा पोलिसांची नियमित नाकाबंदी होत असल्याने वाहनांची तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची वर्दळ कायम असते. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठांनी या समस्येकडे मोखाडा नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्याची मागणी केली आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या नजरेआड कशी राहिली समस्या?
मोखाडा चौफुलीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते प्रकाश निकम यांचे निवासस्थान आहे. एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याची बाब स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न महिला प्रवासी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोखाडा चौफुली पर्यत नगरपंचायत ची हद्द आहे. येथे प्रसाधनगृह बांधण्यासाठी पुढील जिल्हा नियोजन बैठकीत प्रस्तावित करण्यात येईल.
- रितेश बैरागी, मुख्याधिकारी, मोखाडा नगरपंंचायत