Mokhada News | ‘शिक्षणाच्या पहिल्याच पायरीला तडा’ : मोखाड्यातील २९ अंगणवाड्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

चिमुकल्यांचे शिक्षण गळक्या छताखाली
अनेक अंगणवाड्यांची अशी दुरवस्था झाली आहे.
अनेक अंगणवाड्यांची अशी दुरवस्था झाली आहे.
Published on
Updated on

दीपक गायकवाड

खोडाळा : आदिवासी बहुल मोखाडा तालुक्यात भविष्य घडवणाऱ्या चिमुकल्यांच्या पहिल्या बालबोध शिक्षणाच्या पायरीलाच गळती लागली आहे. तालुक्यातील एकूण २०८ अंगणवाड्यांपैकी तब्बल २९ इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामूळे लहान मुलांना धोकादायक गळक्या इमारती मध्ये शिक्षण घ्यावे लागते आहे.पावसाळ्यात तर या इमारतींची दुरवस्था अधिकच प्रकर्षाने जाणवते आहे.

तालुक्यातील २०८ अंगणवाड्यांमधून आदिवासी भागातील हजारो बालकांवर पूर्वप्राथमिक शिक्षणाचे संस्कार केले जातात. यापैकी १४० अंगणवाड्या स्व-मालकीच्या इमारतीत, ४६ खाजगी मालकीच्या इमारतीत, १० समाज मंदिरात तर १२ अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीत भरवल्या जात आहेत.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षात केवळ १४ इमारतींच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे, तर यंदाच्या वर्षात १३ इमारती दुरुस्तीसाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय खोडाळा पैकी तळ्याचीवाडी व इतर एक अशा २ इमारती विशेष दुरुस्तीसाठी गरजेच्या असून त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

️ निधी आहे, पण इच्छाशक्तीचा अभाव..!

शासन निर्णयानुसार - जिल्हा वार्षिक योजनेतून (DPDC) महिला व बाल सशक्तीकरणासाठी किमान ३ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला असून, यातून अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम व दुरुस्ती केली जाते. याशिवाय डोंगरी विकास कार्यक्रम, जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि सीएसआर उपक्रमांतर्गतही नवीन अंगणवाडी इमारती उभारल्या जातात.तसेच नवीन बांधकामासाठी शासनाच्या नवीन निर्णयामुळे आता आदिवासी व डोंगराळ भागासाठी २० लाख ३५ हजार रुपये निधी मिळणार आहे, तर जुन्या अंगणवाडी दुरुस्तीसाठी एक लाख रुपये दिले जाणार आहेत.

आत्ता कसा शिकू अआई...!

म्हणजेच कागदावर सर्व योजना आहेत, पण प्रत्यक्षात चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे. कागदावर आकडे फिरत असताना प्रत्यक्षात मात्र चित्र भयावह आहे. पावसाळा सुरू झाला की अनेक अंगणवाड्यांच्या छतांतून पाणी गळते. भिंतींना ओल येते. जमीन चिखलाने भरते. आणि याच ओल्या, कुबट वातावरणात ३ ते ६ वर्षांची चिमुकली पिढी 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंतची अक्षरे गिरवते.

ही गैरसोय नव्हे जीवघेणा धोका आहे.

ही केवळ गैरसोय नाही तर जीवघेणा धोका आहे. राज्यात अनेक ठिकाणी अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळून चिमुकले थोडक्यात बचावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती हा केवळ सोयीचा नाही तर सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

धोरणात्मक अंमलबजावणी महत्त्वाची.

शासन मोठमोठ्या घोषणांमध्ये कोट्यवधींचा खर्च दाखवत असताना, जिथे खऱ्या अर्थाने गुंतवणूक हवी आहे तिथेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच अनेकदा ठेकेदार असल्याने या प्रश्नावर कोणीही आवाज उठवायला तयार नाही.त्यामुळे"गळकी झाली शाळा, आता कुठे शिकशील बाळा?"हा प्रश्न आज मोखाड्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाला भेडसावतो आहे. अंगणवाडी ही केवळ इमारत नाही, तर आदिवासी पाड्यावरील मुलांच्या आयुष्याची पहिली पायरी आहे. तीच पायरी जर डगमगती असेल तर उद्याचे भविष्य कसे उभे राहणार?हा यक्षप्रश्न आहे.शासनाने याबाबत धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news