

वाडा : मच्छिंद्र आगिवले
गौरीगणपती सणाची चाहूल लागताच ग्रामीण भागातील जीवन आनंदाने बहरून कोकणात गावागावात उत्साहाला जणू उधाण येते. वाडा तालुक्यातील खेडेगावातील कष्टकरी वर्ग आजही ढोलकी व तारप्याच्या तालावर ठेका धरू लागतात. मोज शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोलकीच्या तालावर फेरा धरून आपल्या संस्कृतीचा वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला असून शिक्षकांनी देखील यात सहभाग घेतला होता.
ग्रामीण भागात गणेशोत्सवाची अनोखी रंगत असून आजही पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. पारंपरिक नृत्य हा या सणाचा महत्त्वाचा भाग असून रात्रभर जागरण करून बाप्पाला प्रसन्न केले जाते. घराघरात आठ दिवस आधीपासून वातावरण तयार होऊ लागते ज्यामुळे शाळकरी मुले शाळेत सतत गाणी गुणगुणत असतात.
मोज शाळेतील शिक्षकांच्या ही बाब लक्षात येऊन त्यांनी एकाला ढोलक्या बनवून विद्यार्थांना फेरा धरायला लावला.चिमुकल्या विद्यार्थांनी मनसोक्त नाच केला असून यात शिक्षकांनी देखील आपली हौस भागवून मुलांना प्रोत्साहन दिले. लोकपरंपरांचे व सांस्कृतिक वारशाचे जतन व्हायला हवे असे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मत मांडलेले असून मोज या आदर्श शाळेने त्याचेच अनुकरण केले आहे.
कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आजकाल तारपा व ढोकली नृत्याशिवाय पूर्ण होत नसून अगदी पंतप्रधान असो की राज्यपाल यांनाही अशी पारंपरिक नृत्य भुरळ घालतात. वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात गौराईच्या विसर्जनापर्यंत अशी पारंपरिक नृत्य जागरण गाजवणार असून आजपासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.