

पालघर ः मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीतील जंगल परिसरात मुंबईतील माजी अंडर-19 फुटबॉलपटू सागर सोरटी (35) याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी कासा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मयत फुटबॉलपटू सागर सोरटी 15 नोव्हेंबर रोजी पुणे येथे फुटबॉल खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता. दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या त्याचा मृतदेह मेंढवण खिंडीतील जंगलात आढळून आला. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. विशेष म्हणजे त्याच्या धाकट्या भावाचे लग्न अवघ्या 15 दिवसांवर आले असून, त्याच्या तयारीबाबतही सागरने कमी रस दाखवला होता. लग्नासाठी नवे कपडे शिवण्यास त्याने नकार दिल्याने त्याचे कुटुंब अधिक चिंतेत होते.
सागरचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. “शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई करता येईल,” अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली. एकेकाळचा प्रतिभावान असलेला फुटबॉलपटू अशाप्रकारे कायमचा निघून गेल्याने क्रीडावर्तुळातही शोककळा पसरली आहे.