

खानिवडे, पुढारी वृत्तसेवा : वसई पूर्वेतील शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरील मांडवी येथे एका चालत्या ट्रकवर वडाचे अजस्त्र झाड कोसळले. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणत्याही जीवित हानी झाली नाही. चालक व सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.१३) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरून ट्रक शिरसाडच्या दिशेने येत होता. यावेळी रस्त्यालगत जुने असलेले वडाचे झाड अचानक कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. मांडवी पोलिसांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
अर्नाळा, नाशिक या राज्यमार्गावरील शिरसाड ते अंबाडी फाटा या दरम्यान एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. सध्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू आहे. भिवंडी, वाडा या भागाला जोडणारा हा रस्ता अहोरात्र वाहनांच्या वर्दळीने व्यस्त असतो. या मार्गावरून कारखानदार , कामगार, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकामे सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली सुमारे १०० वर्षांहून जुनी अजस्त्र झाडे आहेत. दर पावसाळ्यात ही झाडे कोसळतात.