

पालघर : दुपारच्या जेवणानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर जात असताना अचानक चक्कर येऊन तोल गेल्याने हातातील कात्री छातीत घुसल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका परिसरात घडली. सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेत लोखंडी कात्री छातीत घुसल्याने अती रक्तस्राव झाल्याने नरेश मोहनलाल प्रजापती (वय.30) यांचा मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका येथील गणपती मंदिरासमोरील परिसरात राहत होते. सोमवारी (दि. १९)दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुपारचे जेवण झाल्यानंतर ते कपडे कापण्याच्या कामासाठी घराच्या पहिल्या मजल्यावर जात होते. यावेळी त्यांच्या डाव्या हातात लोखंडी कात्री होती.
घरातील जिन्याने वर जात असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते पुढील बाजूने पडल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या हातातील लोखंडी कात्री छातीच्या भागात घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. छातीतून रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत नरेश यांना तातडीने उपचारासाठी मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
संशयास्पद प्रकार नसल्याची नोंद
या घटनेबाबत कुसुम प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश यांना जिन्यावर चक्कर येऊन तोल गेल्याने हा प्रकार घडला. त्यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे तसेच कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.