वाडा : वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कादिवली येथील एका चिमुकल्याला भरधाव वाहनाने चिरडून घडलेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास केला जात असून पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
गुरुनाथ बाळू वाघ असे या अडीच वर्षीय चिमुकल्याचे नाव असून कादिवली येथील आपल्या घराच्या शेजारी गुरुवारी रस्त्याजवळ तो खेळत होता. याच भागातून भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू मृत्य झाला. अपघातातील फरार आरोपीला अजूनही पोलीसांनी जेरबंद केले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी आपल्या तपासात कोणताही कसूर न ठेवता आरोपीला गजाआड करुन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी सर्वांची मागणी आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंदे यांना याबाबत विचारणा केली असता अपघात घडला असे ठाम सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी आपल्याकडे नसल्याने आपण हा अपघात आहे असे फिर्यादीवरून मानत आहोत. यादिशेने यंत्रणा तपास करीत असून यातील दोषी बिरोधात निश्चितच कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
हल्ली लहानलहान ग्रामपंचायतींमध्ये सुरक्षेच्या उद्देशाने सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असताना वाडा शहरातील खिळखिळी झालेली ही यंत्रणा केवळ दिखाव्यापुरती आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस तपासात किती महत्त्वाची भूमिका बजावते हे स्पष्ट होत असून शहरात तात्काळ जागोजागी सीसीटिव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.