

Mokhada Police Action
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील गोमघर परिसरात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मोखाडा पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर विशेष मोहीम राबवण्यात आली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवारी खोडाळा जवळील गोमघर सपाटी परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन लक्ष्मण गांगड आणि अनिल सवराचा या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भरधाव आणि बेदरकार वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.
मोखाडा, खोडाळा आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये अल्पवयीन मुले तसेच तरुणांकडून भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय चौकाचौकात वाहनांची बेशिस्त पार्किंग केली जात असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर मोखाडा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवत विना हेल्मेट वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, सीट बेल्टचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी चुकीची पार्किंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, अवैध प्रवासी वाहतूक तसेच ओव्हरलोडिंग यांसारख्या प्रकारांवर कारवाई केली. या मोहिमेत विविध वाहनांवर एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन मोखाडा पोलिसांकडून करण्यात आले आहे.