

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोळ येथील नाल्याजवळील पुलावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
महामार्गावरील नवीन सिमेंट काँक्रीटकरणाचे काम अंतिम टप्प्यात असूनही अनेक ठिकाणी, विशेषतः पुलांच्या सुसंधी भागात, काम अपूर्ण आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरच महामार्गावरील काही भाग खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. हे खड्डे लहान वाहनांसाठी तर जणू सापळाच ठरत आहेत.
घोळ टोल नाक्याजवळील पुलाच्या परिसरात मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते, परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्नही उग्र बनत आहे. प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघात टाळण्यासाठी अनेकांना रस्ता बदलण्याची वेळ येत आहे.
स्थानिक नागरिक व नियमित प्रवासी यांनी महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीकडे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. त्यांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही जर असे खड्डे बुजवले गेले नाहीत, तर यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वाहनचालकांनी घेतली आहे. महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वाहतूक होत असून अशा धोकादायक ठिकाणी जलद उपाययोजना न झाल्यास याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असल्याचे चित्र आहे.