

पालघर ः पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या अनेक घटना गेली अनेक दिवस सुरू आहे. पालघर पोलीस अधीक्षक आतिश देशमुख यांनी यावर कठोर भूमिका घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी प्रदीप पाटील यांनी गुप्त माहितीच्या आधारे विक्रमगड येथे कारवाई करत विक्रमगड जव्हार महामार्गावर दहा किलो गांजा पकडण्यात यश आले आहे. नाशिक कडून बोईसरकडे येणार्या गाडीला वेळीच पकडल्याने कारवाईला यश आले आहे. या कारवाई वरती नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर भागातील दोन तरुणांकडून एमडी ड्रग्ज पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. काही महिन्यांपूर्वी पालघर पोलिसांनी देखील मनोर येथील एका तरुणांकडून एमडी ड्रग पकडण्यात यश मिळवले होते. बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा तसेच इतर अमली पदार्थ विक्री होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी प्रदीप पाटील यांनी या सर्व प्रकरणाच्या विरोधात ठोस भूमिका घेत एकेकाच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी यांना त्यांच्या गुप्त माहितीनुसार नाशिक कडून बोईसर येथे गांजा येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. 13 जूनला रात्री विक्रमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशवंत नगर परिसरात त्यांनी सापळा रचला. सोबतीला विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी रविंद्र पारखे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रवींद्र वानखेडे गोरक्षनाथ राठोड भगवान पाटील या अधिकार्यांना सोबत घेत पोलीस हवालदार दिलीप जनाठे,संतोष निकोले, संजय धांगडा,उत्तम बिरारी, शिवाजी भोईर या आपल्या अनुभवी साथीदारांना घेत पोलीस अंमलदार प्रशांत निकम विशाल कदम, संदीप, भालचंद्र भोये, सुशील बांगर यांना जबाबदार्या देत कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार सुटता कामा नये यासाठी खबरदारी घेतली.
रात्री साडेआठ वाजल्यानंतर एक सफेद रंगाची वेरना गाडी गुजरात राज्याच्या पासिंग नंबर असलेली आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अशीच गाडी असल्याने त्या गाडीला थांबवून त्या गाडीची झडती घेण्यात आली. गाडीमध्ये नाशिक येथील कुंभारवाडा येथे राहणारे सतीश लक्ष्मण वाघ वय 52 वर्ष व त्याच्यासोबत सागर सोमनाथ बलसाने वय 29 वर्ष यांना गाडीखाली उतरवले. गाडीची झडती घेतली असता गाडीचा डिक्कीत दहा किलो 258 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य माल मिळून आला. अधिक तपासणी करता तो गांजाच असल्याचे सिद्ध झाले. विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास विक्रमगड पोलीस करीत आहेत.