

पालघर : हनिफ शेख
तिसरी मुंबई रायगडमध्ये विकसित होत असतानाच आता पालघरमध्ये चौथी मुंबई आकाराला येत आहे. वाढवण-मुरबे बंदर, बुलेट ट्रेन, प्रस्तावित विमानतळ, मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, अलिबाग ते विरार कॉरिडॉर आदी महाकाय प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा करून प्रस्तावित कामांची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी पुन्हा एकदा पालघर चौथी मुंबई होणार, असा उल्लेख केला. मात्र, चौथी मुंबई नेमकी कशी असेल, याबाबत जाणून घेऊया.
देशातील नंबर एकचे आणि जगातील दहा बंदरांपैकी एक असे वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात होऊ घातले आहे. त्याशिवाय मुरबे बंदराचीदेखील तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन हादेखील पालघर जिल्ह्यातूनच जात आहे. यासाठी बोईसर आणि विरार या ठिकाणी दोन स्थानके होणार आहेत.
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळही साकारले जाणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील बोजा आपोआप कमी होईल. त्याचबरोबर मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. भारत सरकारमार्फत एक लाख कोटी रुपये खर्चुन १,४०० कि.मी. लांबीचा आठपदरी ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांना जोडणार आहे.
तीन मोठी आव्हाने...
मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी पाणी कुठून आणणार, हा प्रश्न आहे. यासाठी सूर्या धरणासह इतर धरणे या भागात निर्माण करावी लागतील.
पर्यावरणाचा विचार करून तारापूर किनारपट्टी आणि डोंगररांगा वाचवून हा विकास करावा लागेल. स्थानिकांना विस्थापित केल्यास ते हा बदल स्वीकारणार नाहीत.
स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे. स्थानिक तरुणांना स्किल ट्रेनिंगसह नोकरी देण्याच्या दृष्टीने शासन काम करते. मात्र, यात सर्वच भागातील तरुणांना संधी हवी.
वाढवण बंदर : वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापार नकाशावर अधिक मजबूत स्थान मिळण्याची शक्यता आहे. या बंदरामुळे १० लाख नोकऱ्या मिळतील.
ग्रीनफिल्ड महामार्ग : भारत सरकारमार्फत सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणारा १,४०० कि.मी. लांबीचा आठपदरी ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग.
बुलेट ट्रेन : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे मुंबई ते पालघर हे अंतर केवळ ४५ मिनिटांत पार करणे शक्य होईल.
आंतरराष्ट्रीय विमानतळ : पालघरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल.
१५ वर्षांत विकास : पालघर जिल्हा पुढील १५ वर्षांत इंडस्ट्री कनेक्टिव्हिटी आणि स्मार्ट टाऊनशिपच्या जोरावर मुंबई, नवी मुंबई, ठाण्यानंतरचा सर्वात मोठा शहरी पट्टा होईल.
स्वस्त जमिनी : बोईसर, तारापूर, डहाणूपट्ट्यात अनेक एकरच्या जमिनी विकसित करण्यायोग्य आहेत. यामुळे मुंबईच्या तुलनेत येथील जमिनीची किंमत कमी असेल.
फार्मा हब : बोईसर एमआयडीसी राज्यातील सर्वात मोठी फार्मा केमिकल इंजिनिअरिंग हब. तारापूर अणुऊर्जा डेल्टा सेंटर ऊर्जा व आयटी बॅकबोन आहे.
पर्यटनाला चालना : पालघर जिल्ह्यातील निसर्ग, तारापूर-शिरगाव समुद्रकिनारा, मोखाडा जव्हार हिल स्टेशनदेखील पूर्वेचे महाबळेश्वर म्हणून विकसित होणार.