Palghar Drought | ‘गहू नाही तर..! आन मिलो सजना... सुना पड़ा अंगना’ : खोडाळा - मोखाड्यात का होत आहेत या गाण्याच्या आठवणी ताज्या!

यंदाच्या दुष्काळाने खोडाळा - मोखाड्यात 1972 च्या आठवणी झाल्या ताज्या, १९७० सालच्या चित्रपट गीताने घेतले होते पोटातील आगीचे स्वरुप
Palghar Drought | ‘गहू नाही तर..! आन मिलो सजना... सुना पड़ा अंगना’ : खोडाळा - मोखाड्यात का होत आहेत या गाण्याच्या आठवणी ताज्या!
Published on: 
Updated on: 

दीपक गायकवाड

खोडाळा :जुन्या काळातली एक हाक आज पुन्हा काळजाला भिडतेय. "आन मिलो सजना..." ही हाक पहिल्यांदा १९७० साली रुपेरी पडद्यावर घुमली. राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्या अभिनयाने सजलेला ‘आन मिलो सजना’ हा चित्रपट तेव्हा मनोरंजनाचा विषय होता. पण त्याच नावाने ७२ च्या दुष्काळात खोडाळ्याच्या मातीत आन मिलो सजना हे गाणं जन्माला आलं, जे मनोरंजन म्हणून नव्हतं, तर ती होती जगण्याची धग , आणि पोटातील आग.

१९७२ चा दुष्काळ... न भूतो न भविष्यती

१९७२ चा दुष्काळ... न भूतो न भविष्यती. आकाशाने पाठ फिरवली, धरतीने तोंड वळवलं. पाऊस नावालाच. विहिरी आटल्या, नद्या कोरड्या पडल्या. शेतातल्या राबत्या हातांना काम नव्हतं आणि घरातल्या चुलीला आगीसोबत भाकरीचा प्रश्न होता.अशोक खैरनार आणि अकबर खान या खोडाळा येथील हौसी कलाकारांच्या साथीने त्या काळातील तत्कालीन शाहीर दाऊद अब्दुल खान यांनी आपल्या बुलंद आवाजात हीच हाक दिली होती "आन मिलो सजना, गहू नाही तर..."

दुष्काळाचं चित्र आज पुन्हा एकदा ताजं

कोणी लिहीलं याचे संदर्भ सापडत नसले तरीही त्यावेळी हे गाणं गावागावात, वाड्या-वस्त्यांवर गायलं जायचं. लोक म्हणायचे, "आन मिलो सजना... सुना पडा अंगना". ते अंगण सूनं होतं कारण घरात धान्य नव्हतं. अंगणात खेळणारी लेकरं भुकेने व्याकुळ होती. आईच्या पदराला धान्याचा कण लागावा म्हणून ती वाट पाहत होती. शाहीरांच्या गाण्यात दुष्काळाचं ते भयाण वास्तव उतरलं होतं.

पुढे काळ बदलला. २००२ साली आलेल्या ‘गदर’ चित्रपटातही हेच गीत नव्या रूपात आलं. पण खोडाळ्याच्या मातीतलं ते जुनं गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे.कारण दुष्काळाचं चित्र आज पुन्हा एकदा ताजं झालेलं आहे.

आज पुन्हा तीच परिस्थिती डोळ्यासमोर उभी आहे. पाऊस लहरी झाला आहे.वेळेवर येत नाही, आला तर धो-धो कोसळतो आणि जातो तेव्हा कोरडं मागे ठेवून जातो. विहिरींची पातळी खालावत आहे. भातशेती वाळून चालली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पूर्वी दुष्काळात गहू नव्हता, आजही परिस्थिती वेगळी नाही. फरक एवढाच की पूर्वी लोकांकडे खायला गहू नव्हता, आज शेतकऱ्याकडे पिकवायला पाणी नाही.

खोडाळा, मोखाडा परिसरातील आदिवासी, शेतकरी आजही त्याच विवंचनेत आहे.रोजगार नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही.१९७२ मध्ये लोकांनी दुष्काळाशी दोन हात केले. छावण्यांमध्ये राहिले, खडी फोडली, रस्ते केले, पण हार मानली नाही. आजही तोच संघर्ष आहे. पण आजच्या दुष्काळात माणसाच्या मनातली ओलही आटत चालली आहे का..? , असा प्रश्न पडतो.

शाहीर दाऊद अब्दुल खान यांचं ते गाणं आजही आठवतं, कारण ते गाणं केवळ शब्द नव्हते, ती काळाची हाक होती. "आन मिलो सजना..." म्हणजे तू ये, सजना ये, आमचं सुनं अंगण भरून जा. आज तो सजना म्हणजे पाऊस आहे. पावसा, तू ये, आमची शेतं भिजव, आमची लेकरं जगव.

आजच्या राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने १९७२ च्या दुष्काळातून धडा घ्यायला हवा.तेव्हा लोकांनी एकमेकांचा हात धरला होता. आजही जर सरकारने वेळेवर टँकर, चारा छावण्या, रोजगार हमीची कामं सुरू केली, तर हे सुने अंगण पुन्हा फुलू शकतं. नाहीतर पुन्हा एकदा खोडाळ्याच्या मातीतून तीच हाक घुमेल - आन मिलो सजना, गहू नाही तर...

मिलो गहू अमेरिकेतून आलेला दुष्काळाचा आधार

मिलो हे गहू किंवा ज्वारीसारखं आपल्या मातीतलं धान्य नव्हतं. हा ज्वारीचाच एक प्रकार. इंग्रजीत याला 'मिलो सॉरगम' किंवा 'ग्रेन सॉरगम' म्हणतात. दाणे लालसर-पिवळसर, ज्वारीपेक्षा थोडे लहान आणि कडक असतात. दिसायला ज्वारीसारखा असला तरी चवीला वेगळा, थोडा उग्र आणि खरखरीत.

१९७२ च्या महाभयंकर दुष्काळात महाराष्ट्रात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गहू, तांदूळ मिळेनासा झाला. तेव्हा केंद्र सरकारने अमेरिकेतून पीएल-४८० करारांतर्गत मोठ्या प्रमाणात हे मिलो धान्य आयात केलं. अमेरिकेत जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जाणारा हा सॉरगम भारतात माणसांच्या जगण्याचा आधार ठरला.आज परिस्थिती तशी नाही. सरकार खंबीरपणे पाठीशी उभे आहे. उपाययोजना करत आहे. पण तरीही शेतकऱ्यांच्या घामाला पावसाने हात दाखवल्याने ७२ च्या दुष्काळी जखमेवरील खपली निघाली ती निघालीच. मोखाडा तालुक्यातील पिक परिस्थिती.नागली आणि भाताची समूळ वाट लागली आहे.

मूळ चित्रपटातील असे आहे गाणे

आन मिलो सजना सजना रे
आन मिलो सजना
अंखियों में ना
आये नींदियाँ
अंखियों में ना
आये नींदियाँ
मोहे न भाये काजल बिंदिया
सुना पड़ा अंगना अंगना
सुना पड़ा अंगना अंगना
सुना पड़ा अँगना रे अँगना रे

या गाण्याचा आधार घेत त्‍याकाळातील भीषण परिस्थितीचे चित्रण खोडाळा माखोड्यातील शाहिरांनी केले होते. याज सजना म्हणजे पावसाला विशेषण दिले तो पडत नाही त्‍यामुळे सूनं पडलेले अंगन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news