

पालघर : पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर विधानसभा शिवसेनेकडे गेल्या आहेत. मात्र जिल्ह्यात एकाही शिव सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांला उमेदवारी न मिळाल्याने नाराजी पसरली आहे. याचा फटका विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालघरमधील शिवसेनेच्या गोटात कही खुशी, कही गम अशी स्थिती सध्या पालघर जिल्ह्यात दिसत आहे. निवडणूक बिगुल वाजल्यापासून पालघर विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार व निष्ठावान अस लेले श्रीनिवास वनगा यांना एकनाथ शिंदे शिंदे यांनी आमदारकीच्या तिकिटाचा शब्द दिला होता, त्यामुळे वनगा यांचे तिकीट पहिल्या दिवसापासून जवळपास निक्षित मानले जात होते. मात्र शेवटच्या क्षणी भाजपमधून शिवसेनेत घुमजाव केलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या प्रकारामुळे शिव सेनेत धुसफूस निर्माण झाली. वनगा यांना समर्थन देणाऱ्या गटात गावितांच्या उमेदवारी घोषणेनंतर प्रचंड नाराजीचा सुर निर्माण झाला, गावितांच्या उमेदवारीमुळे वनगा समर्थक गट त्यांच्याविरोधात काम करण्याची शक्यता आहे. निष्ठावान सोडून आपात उमेदवाराला तिकीट मिळाल्याने राजेंद्र गावित यांना मोठा फटका बसू शकतो.
पालघरपाठोपाठ बोईसर विधानसभेतही पालघर सारखीच स्थिती निर्माण इशली आहे. शिवसेनेचे निष्ठावान अशी ख्याती असलेले जगदीश भौडी यांना तिकीट मिळणार असे जवळपास मानले जात असताना राजेंद्र गावित यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे विलास उरे यांना बोईसरची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एका गटामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. निष्ठावान सोडून आयात उमेदवाराला संधी दिल्याने या संधीचे सोने करून देणार नाही, असे संदेश सर्वत्र पसरत आहेत. त्यामुळे बोईसर विधानसभेतही महायुतीला ही निवडणूक जड जाणार असे दिसून येते. याउलट महायुतीच्या असंतोषामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर व बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये आयात उमेदवारांना संधी दिल्यामुळे जिल्हाभरातील शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण उफाळून आले आहे. याचे पडसाद समाज माध्यमांवरही दिसून येत आहेत. त्यामुळे राजेंद्र गावित व विलास तरे या दोन्ही उमेदवारांना ही निवडणूक सहज शक्य होणारी नाही. शिवसैनिकांच्या अंतर्गत रोषाला या दोन्ही उमेदवारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघा मधील इच्छुक उमेदवारांची मोठी फळी गावित व तरे यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. तर या दोन्ही उमेदवारांसोबत असलेली एक फळी सर्वाधिक मते मिळवण्यासाठी जंग जंग पहाडणार असल्याचे सांगितले जात आहे.
डहाणू विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला स्थान मिळेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष माकपचे तगडे उमेदवार विनोद निकोले यांच्यासमोर तगडा उमेदवार नसल्यामुळे ही जागा शिवसेनेऐवजी भाजपला गेली आहे. इथे शिवसेनेचा खंबीर उमेदवार नसला तरी नाराज असलेले आमदार श्रीनिवास बनगा यांना येथील तिकीट देऊन त्यांचे पूनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार होता, मात्र भाजपाला ही विधानसभा जागा वाटपात गेली असून भाजपचे विनोद मेडा यांना उमेदवारी मिळाल्याने येथेही श्रीनिवास बनगा यांचे तिकीट कापले गेले आहे. तिसरीकडे शिवसेनेचे निष्ठावान व जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांना विक्रमगडमध्ये शिवसेनेमार्फत उमेदवारी मिळेल व त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण तयारी केली असताना अचानक ही विधानसभा भाजपकडे गेल्याने विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील शिव- सेनेमध्ये प्रचंड खदखद आहे.
एक दिवसा आधीच शिवसैनिकांनी एकत्र येत या प्रकारावर खेद व्यक्त केला होता. याचा फटका भाजपाला बसण्याची दाट शक्यता आहे. तर विक्रमगड विधानसभेमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये अग्रस्थान घेणारे प्रकाश निकम हे उमेदवारी अर्ज भरून महायुतीची डोकेदुखी वाढवणार आहेत असे समजते. त्यामुळे पालघर जिल्ह्यात भाजपामार्फत दावा करण्यात आलेल्या पालघर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेला गेल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. भाजपचे जिल्हा संघटक संतोष जनाठे पुन्हा एकदा बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. याआधी त्यांनी बोईसर मध्ये बंड केल्याने भाजपच्या उमेदवाराला ही निवडणूक गमवावी लागली होती आता पालघर विधानसभेतून बंडखोरी करत संतोष जनाठे यांनी पुन्हा अर्ज दाखल केल्यास महायुतीतील भाजपची मतं त्यांच्याकडे वळतील याचा मोठा फटका शिवसेनेला बसणार असून त्याचे विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पालघर, बोईसर व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पालघर जिल्ह्यात निष्ठावान शिवसैनिकांनी दिवसरात्र एक करून शिवसेना वाढवण्याचे काम केले आहे. अल्पावधीत शिवसेनेने पालघर जिल्ह्यात मोठा विस्तार केला असला तरी विधानसभा निवडणुकांमध्ये निष्ठावानांना स्थान न मिळाल्याने शिवसैनिक बंडाळीच्या तयारीत आहेत.
बाहेरून शिवसैनिक म्हणून काम करण्याची तयारी त्यांची असली तरी अंतर्गतरित्या ते या आयात उमेदवारांच्या विरोधात काम करतील अशी दबकी चर्चा सध्या सर्वत्र आहे. असे झाल्यास या बंडाळीचा फायदा महाविकास आघाडीला होणार असून त्यांच्या उमेदवारांना विजयासाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त होत आहे.