

विरार ः वसईच्या राजोडी समुद्रकिनार्यावर 18 जून रोजी सकाळी एक मृत डॉल्फिन मासा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समुद्र किनार्यावर नियमित गस्त घालणारे जीव रक्षक चारुदत्त मेहेर यांना भरतीच्या पाण्यासोबत वाहून आलेला हा मासा दिसून आला.
डॉल्फिनचा मृतदेह आढळताच चारुदत्त मेहेर यांनी तात्काळ वन संरक्षण विभाग व वसई-विरार महापालिका प्रशासनास माहिती दिली. महापालिकेच्या यंत्रणेकडून तत्काळ खोदकाम यंत्र (जेसीबी) घटनास्थळी पाठवण्यात आले. नंतर जीव रक्षक जनार्दन मेहेर आणि चारुदत्त मेहेर यांनी मृत डॉल्फिनचे मोजमाप केले. या नोंदीनुसार डॉल्फिनची लांबी आठ फूट तर अंदाजे वजन 125 किलो इतके होते.
प्रकृतीला कोणतीही हानी न पोहोचता आणि किनार्याची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी, महापालिकेच्या कर्मचार्यांनी समुद्रकिनारीच खोल खड्डा खोदून डॉल्फिनचा मृतदेह शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीत पुरण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया वनविभागाच्या देखरेखीखाली व जीव रक्षकांच्या उपस्थितीत पार पडली.
विशेष म्हणजे, याआधीही याच राजोडी किनार्यावर डॉल्फिन व वेल मासा मृत अवस्थेत सापडल्याची नोंद जनार्दन मेहेर यांनी केली आहे. त्यामुळे या भागातील समुद्री जैवविविधतेची स्थिती आणि बदल याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.
समुद्रातील अशा दुर्मिळ प्राण्यांचे मृतावस्थेत किनार्यावर येणे ही चिंतेची बाब असून, हे निसर्गाने दिलेले संकेत आहेत. पर्यावरणाच्या संतुलनासाठी समुद्रकिनार्यांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
जनार्दन मेहेर, जीव रक्षक