

Palghar Burhanpur Chinchpada Girl Death
कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी कडू पाडा येथील १७ वर्षीय अंजली विष्णू कडू हिचा बऱ्हाणपूरमधील चिंचपाडा परिसरात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बाथरूममध्ये जाताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी अंजलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे कासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते ७.४५ वाजण्याच्या दरम्यान बऱ्हाणपूर येथील चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. अंजली एका परिचित तरुणाच्या घरी असताना बाथरूममध्ये जाताना पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले. या घटनेत तिच्या डोक्याला दुखापत झाली.
त्यानंतर अंजलीला उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी सुमारे ७.४५ वाजता ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
कुटुंबीयांचा संशय; चौकशीची मागणी
अंजलीच्या मृत्यूबाबत कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. अंजलीचे वडील विष्णू कडू यांनी सांगितले की, बऱ्हाणपूर-चिंचपाडा येथील एका तरुणाने अंजलीला कुटुंबीयांना न सांगता घरी नेले होते. त्यानंतर अंजलीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले. घटनेची माहिती नातेवाईकांकडून कुटुंबीयांना मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी गेल्याचे त्यांनी सांगितले.
अंजलीचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी तिचे वडील विष्णू कडू यांनी केली आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कासा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक तपास करीत आहेत. इनक्वेस्टची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक राजीव चौधरी यांनी केली आहे.
कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, अंजलीचा मृत्यू अपघाती होता की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.