

पालघर: पालघर तालुक्यातील चहाडे गावात गोवंश कत्तल आणि गोमांस वाहतुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २०० किलो गोमांस, इको कार आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
शनिवारी रात्री चहाडे गावातील एका व्यक्तीच्या शेतातील घरात गोवंशाची कत्तल करून गोमांसाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती बजरंग दल आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर कार्यकर्त्यांनी चहाडे गाव परिसरात सापळा रचला होता. रविवारी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास एक इको कार चहाडे गावातून भरधाव वेगाने निघाल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. कार चहाडे नाका मार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जात असताना कार्यकर्त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कारमधील व्यक्तींनी मासवण गावाच्या हद्दीतील दहिसर फाटा परिसरात इको कार सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पाठलाग करून एका व्यक्तीला पकडले. दरम्यान, एका संशयास्पद दुचाकीचा पाठलाग केला असता पालघर-मनोर रस्त्यावरील गोवाडे घाट परिसरात दुचाकी सोडून दोघे जण जंगलाच्या दिशेने पसार झाले.
कार्यकर्त्यांनी दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरांना गुंगी आणण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन आणि सुया आढळून आल्या. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डायल ११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती पालघर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
इको कारमध्ये आढळून आलेल्या गोमांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी चहाडे गावातील संजय उर्फ पिंट्या पाटील याच्या शेतातील घराची पाहणी केली असता घराजवळ गोवंशाचे अवशेष आढळून आले.
प्राथमिक तपासात चार गोवंशांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी संजय पाटील, तसेच बांद्रा झोपडपट्टी येथील अकबर सय्यद खान आणि अमन अब्दुल शेख यांना अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत बजरंग दलाचे श्रीपाद पाटील, प्रथमेश पिंपळे, चिराग पिंपळे, यांच्यासह आदींचा सहभाग होता.